RRR साठी ऑस्करचे दरवाजे अजूनही खुले; राजामौलींच्या टीमने उचललं मोठं पाऊल

| Updated on: Sep 21, 2022 | 3:15 PM

राजामौलींच्या टीमचे कसून प्रयत्न; RRR ला ऑस्करसाठी पाठवणार?

RRR साठी ऑस्करचे दरवाजे अजूनही खुले; राजामौलींच्या टीमने उचललं मोठं पाऊल
RRR
Image Credit source: Twitter
Follow us on

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘RRR’ या चित्रपटाची ऑस्करसाठी जोरदार चर्चा होती. यामागचं कारणही तसं होतं. ‘व्हरायटी’ या अमेरिकी मीडियाने ऑस्कर एण्ट्रीसाठी (Oscar Entry) RRR या चित्रपटाचा अंदाज वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षात वेगळंच घडलं. ‘छेल्लो शो’ (Chhello Show) हा गुजराती चित्रपट यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत प्रवेश म्हणून जाहीर करण्यात आला. ‘आरआरआर’ ऑस्करसाठी न पाठवल्याने चाहते निराश झालेच आहेत. पण चित्रपटाच्या टीमलाही दु:ख झालं आहे. त्यानंतर आता राजामौलींच्या टीमने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

आरआरआरच्या टीमने आता ऑस्कर अकादमीला सर्व श्रेणींमध्ये या चित्रपटाचा समावेश करण्याबाबत विचार करण्याचं आवाहन केलं आहे. एवढंच नाही तर चित्रपटाच्या टीमने आता RRR साठी ऑस्कर मोहीम सुरू केली आहे. म्हणजेच RRR ऑस्करला जाण्याची शक्यता अजूनही कायम आहे.

RRR च्या वितरकांपैकी एक असलेल्या वॅरियन फिल्म्सचे अध्यक्ष डायलन मार्चेट्टी यांनी ‘व्हरायटी’ला सांगितलं की, गेल्या सहा महिन्यांत राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना किती आनंद दिला आहे हे आम्ही पाहिलं आहे. चित्रपटाने जगभरात 140 दशलक्ष डॉलर्स कसे कमावले ते आम्ही पाहिलं.

हे सुद्धा वाचा

“आम्ही जगभरातील चाहत्यांकडून ऐकलंय की हा या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. आम्हीदेखील त्याच्याशी सहमत आहोत. त्यामुळे आम्ही अकादमीला विनंती करतो की सर्व श्रेणींमध्ये RRR ला समाविष्ट करावा. ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ श्रेणीत स्थान मिळवण्यासाठी हा चित्रपट लढणार आहे. सर्वोत्कृष्ट मूळ गाणं (नाटू नातटूसाठी) श्रेणी व्यतिरिक्त, RRR ला दिग्दर्शक, पटकथा, सिनेमॅटोग्राफी, प्रॉडक्शन डिझाइन आणि एडिटिंग यांसह अनेक श्रेणींमध्ये समाविष्ट करण्याची संधी मिळू शकते,” असंही डायलन म्हणाले.

RRR या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये आलिया भट्ट आणि अजय देवगण या बॉलिवूड कलाकारांनीही भूमिका साकारल्या आहेत. वॅरियन फिल्म्सने आता RRR साठी जोरदार प्रचार करण्याचं ठरवलं आहे.

डायलन पुढे म्हणाले, “आरआरआर हा यावर्षीचा भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. अकादमीच्या सदस्यांनी हा चित्रपट केवळ अकादमी स्क्रीनिंग पोर्टलवरच नव्हे तर थिएटरमध्येही पाहावा अशी आमची इच्छा आहे. राजामौली यांनी हा चित्रपट मोठ्या पडद्यासाठी तयार केल्यामुळे सध्या आमचं लक्ष मतदारांना चित्रपट पाहण्यासाठी एकत्रित करण्यावर आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाचा आणि उत्साहाचा फायदा होईल असं मला वाटतं.”