Oscar: ना RRR, ना ‘काश्मीर फाईल्स’.. भारताकडून ऑस्करसाठी ‘या’ चित्रपटाची अधिकृत एण्ट्री

द काश्मीर फाईल्स, RRR ला झटका; ऑस्करच्या ऑफिशियल एण्ट्रीसाठी 'या' चित्रपटाची निवड

Oscar: ना RRR, ना 'काश्मीर फाईल्स'.. भारताकडून ऑस्करसाठी 'या' चित्रपटाची अधिकृत एण्ट्री
Chhello Show
Image Credit source: Twitter
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Sep 20, 2022 | 7:58 PM

ऑस्करच्या परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी यंदा भारतातून कोणता चित्रपट अधिकृतपणे जाणार आहे यावर गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरू होती. RRR, द काश्मीर फाईल्स या चित्रपटांची ऑस्कर एण्ट्रीसाठी चर्चा होती. इतकंच नव्हे तर अमेरिकी मीडिया ‘व्हरायटी’नेही राजामौलींच्या RRR चा अंदाज वर्तवला होता. मात्र हे सर्व अंदाज खोटे ठरले आहेत. ‘छेल्लो शो’ (Chhello Show) हा गुजराती चित्रपट यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत प्रवेश (Indias official Oscars entry)असेल, असं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

पॅन नलिन यांनी ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात भाविन राबरी, भावेश श्रीमाळी, रिचा मीना, दिपेन रावल आणि परेश मेहता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 2021 मध्ये ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट पहिल्यांदा दाखवण्यात आला होता. यानंतर हा चित्रपट विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये दाखवला गेला. फिल्म फेस्टिव्हल्समध्ये या चित्रपटाची भरपूर प्रशंसा झाली.

‘छेल्लो शो’ या चित्रपटात सौराष्ट्रातील ‘समय’ या एका एका बालकाची कथा दाखवण्यात आली आहे. त्याचे वडील गुजरातमधील रेल्वे स्टेशनवर चहा विकतात. एके दिवशी तो प्रोजेक्शन रूममध्ये पोहोचतो आणि भरपूर सिनेमे पाहतो. समयला त्यावेळी सिनेमाबद्दल काहीच माहीत नसतं. पण त्याचं स्वतःचं आयुष्य हा सिनेमा आहे, अशी या चित्रपटाची कथा आहे.

बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला चित्रपट RRR किंवा ‘द कश्मीर फाइल्स’ यंदा ऑस्कर अवॉर्डसाठी पाठवला जाऊ शकतो, अशी चर्चा होती. या दोन्ही चित्रपटांसाठी सोशल मीडियावर जोरदार प्रचार केला जात होता.

ऑस्कर अकादमीचे सदस्य असलेले देश हे दरवर्षी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी स्थानिक भाषेतील सर्वोत्तम चित्रपट पाठवतात. या चित्रपटांपैकी कोणतेही पाच चित्रपट अंतिम टप्प्यात पोहोचतात. या पाच चित्रपटांना ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी नामांकन दिलं जातं.

गेल्या वर्षी दिग्दर्शक पी. एस. विनोदराज यांचा तमिळ चित्रपट ‘कूझंगल’ भारताकडून अधिकृत एण्ट्री म्हणून पाठवण्यात आला होता. परंतु हा चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीतील शेवटच्या पाच चित्रपटांमध्ये स्थान मिळवू शकला नाही. भारताने पाठवलेल्या चित्रपटांपैकी आतापर्यंत फक्त ‘मदर इंडिया’, ‘सलाम बॉम्बे’ आणि ‘लगान’ हे तीनच चित्रपट नामांकनच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकले आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें