ॲक्शन सीनदरम्यान चुकला अंदाज; स्टंटमॅनच्या जीवावर बेतलं, गमावले प्राण

'आर्या' या चित्रपटातील एका ॲक्शन सीनदरम्यान स्टंटमॅन राजूचा मृत्यू झाला. कार पलटण्याच्या सीक्वेन्सचं शूटिंग करताना राजूचा तोल गेला आणि त्यात त्याने आपले प्राण गमावले. प्रसिद्ध अभिनेता विशालने त्याच्या कुटुंबीयांना आयुष्यभर मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

ॲक्शन सीनदरम्यान चुकला अंदाज; स्टंटमॅनच्या जीवावर बेतलं, गमावले प्राण
स्टंटमॅन राजू, अभिनेता विशाल
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 14, 2025 | 10:18 AM

‘आर्या’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका स्टंटमॅनचा मृत्यू झाला. तमिळ अभिनेता विशालने स्टंटमॅन एस. एम. राजू यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रविवारी पा. रंजीत दिग्दर्शित ‘आर्या’ या चित्रपटाच्या सेटवर ते अत्यंत धोकादायक स्टंट करत होते. कार पलटल्याचा हा सीन होता आणि त्याचदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अभिनेता विशालने राजूसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्याच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहित विशालने श्रद्धांजली वाहिली आहे.

विशालने सोशल मीडियावर लिहिलं, ‘ही गोष्ट पचवणं खूप अवघड आहे की स्टंट आर्टिस्ट राजूचं आज सकाळी जॅमी आणि रंजीत यांच्या चित्रपटातील कार पलटण्याच्या सीक्वेन्सदरम्यान निधन झालं. मी राजूला अनेक वर्षांपासून ओळखत होतो आणि त्याने माझ्या चित्रपटांमध्ये अनेकदा धोकादायक स्टंट्स केले होते. तो खूप धाडसी होता. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.’

विशालने या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, ‘या दु:खद वेळी देव त्याच्या कुटुंबीयांना शक्ती देवो. फक्त हे ट्विटच नाही तर मी त्याच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी नेहमीच उभा असेन. शक्य ती मदत करेन. कारण मीदेखील याच चित्रपटसृष्टीतला आहे आणि इतक्या चित्रपटांमध्ये त्याने दिलेल्या योगदानाबद्दल मी त्याचे आभार मानतो. मी मनापासून आणि ते माझं कर्तव्य मानून, त्यांना मदत करेन.’

प्रसिद्ध स्टंट कोरिओग्राफर सिल्वा यांनीसुद्धा इन्स्टाग्राम पोस्ट लिहित राजूला श्रद्धांजली वाहिली. ‘आमच्या महान कार-जंपिंग स्टंट कलाकारांपैकी एक, एस. एम. राजूचं आज कार स्टंट करताना निधन झालं. आमच्या स्टंट युनियनच्या आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या तो सदैव स्मरणात राहील’, अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला.

राजू हा कॉलिवूड इंडस्ट्रीतील एक अनुभवी स्टंट कलाकार होता. तो कोणत्याही भीतीशिवाय धोकादायक ॲक्शन सीन्स सहज करायचा. त्यासाठीच तो इंडस्ट्रीत प्रसिद्ध होता. गेल्या काही वर्षांत त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याच्या कौशल्य, समर्पण आणि धैर्यासाठी त्याला अनेक अभिनेते आणि चित्रपट निर्माते यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली होती. अपघाताच्या वेळी तो ज्या चित्रपटासाठी काम करत होता, तो 2011 च्या तमिळ क्रीडा नाटक ‘सरपत्ता परम्बराई’चा सीक्वेल असल्याचं मानलं जातंय. पुढच्या वर्षी 2026 मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.