Suniel Shetty | ‘माझ्या मुलीला b**ch म्हटलं जातं’; सोशल मीडिया युजर्सवर भडकले सुनील शेट्टी

सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टीने नुकतीच क्रिकेटर के. एल. राहुलशी लग्नगाठ बांधली. अथियाला अनेकदा तिच्या कपड्यांवरून, दिसण्यावरून आणि अभिनयावरून ट्रोल करण्यात आलं आहे. यावरूनच सुनील शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Suniel Shetty | माझ्या मुलीला b**ch म्हटलं जातं; सोशल मीडिया युजर्सवर भडकले सुनील शेट्टी
Athiya and Suniel Shetty
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 23, 2023 | 11:48 AM

मुंबई : ट्रोलिंग हा जणू सोशल मीडियाचा अविभाज्य भागच बनला आहे. सेलिब्रिटींना या ट्रोलिंगचा सर्वाधिक फटका बसतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते सुनील शेट्टी हे सोशल मीडिया आणि ट्रोलिंगविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. सोशल मीडिया हे कशाप्रकारे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं आणि त्यामुळेच बोलण्याची भीती वाटत असल्याचं ते म्हणाले. मुलगी अथिया शेट्टीला जेव्हा ट्रोल केलं जातं, तेव्हा खूप वाईट वाटत असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली.

रणवीरच्या शोमध्ये सुनील शेट्टी म्हणाले, “सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात काहीच प्रायव्हसी शिल्लक राहिली नाही. त्यामुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. एखादं वक्तव्य 15 विविध प्रकारे एडिट केलं जातं आणि त्याचे 15 विविध अर्थ काढले जातात. त्यामुळे मला मोकळेपणे बोलण्याचीही भीत वाटते.”

“कोणत्याही गोष्टीवर मतं मांडताना तुम्ही आम्हाला विचार करायला भाग पाडता. कारण जे आम्ही केलंच नाही त्यावरूनही सतत आमच्यावर टीका होत असते. हे टीका करणारे कोण असतात? ज्यांनी मी ट्विटर आणि फेसबुकवर ओळखतसुद्धा नाही. माझ्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली जाते, माझ्या कुटुंबीयांना आणि मुलीला शिवीगाळ केली जाते.. हे सर्व कशासाठी? ते वाचून मला खूप वाईट वाटतं. कारण मी जुन्या विचारांचा आहे”, असं ते पुढे म्हणाले.

ट्रोलिंगबद्दल शांत बसणार नसल्याचंही सुनील शेट्टी यांनी सांगितलं. ते म्हणाले, “तुम्हाला माहितीये की मी शेट्टींचा मुलगा आहे. मी कधीच शांत बसणार नाही. हे सर्व करण्यासाठी मी माझ्या बळाचा वापर करतोय असंही ते म्हणतील. पण त्यांच्यामुळे एखादी व्यक्ती किती दुखावली जाऊ शकते याचा अंदाजही त्यांना नाही.”

सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टीने नुकतीच क्रिकेटर के. एल. राहुलशी लग्नगाठ बांधली. अथियाला अनेकदा तिच्या कपड्यांवरून, दिसण्यावरून आणि अभिनयावरून ट्रोल करण्यात आलं आहे. यावरूनच सुनील शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सुनील शेट्टी हे नुकतेच ‘हंटर’ या वेब शोमध्ये झळकले होते. या वेब शोला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. ते लवकरच ‘हेरा फेरी 3’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी हे त्रिकूट पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.