
पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केलं. यापुढे कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर त्याला आमच्या पद्धतीने चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, कुणीही अण्वस्त्रांची धमकी दिली, तरी त्याला भीक न घालता निर्णायक प्रहार केला जाईल, अशा स्पष्ट शब्दांत मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला. दहशतवादी आणि त्यांना थारा देणारं सरकार यांना आम्ही वेगळं मानत नाही, असंही त्यांनी ठणकावलं. मोदींच्या या भाषणानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. कंगना राणौत, सुनील शेट्टी, विक्रांत मेस्सी यांसारख्या सेलिब्रिटींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारतीय सैन्यदलांच्या जबरदस्त कामगिरीचं कौतुक केलं आहे.
‘पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही, जय हिंद’ अशी मोजक्या पण रोखठोक शब्दांत अभिनेता सुनील शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर त्याने मोदींचा फोटो शेअर करत पाकिस्तानातील दहशतवादाविरोधातील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘बारवी फेल’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता विक्रांत मेस्सीने लिहिलं, ‘दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही. दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही. पाणी आणि रक्त कधी एकत्र वाहू शकत नाही.’ याशिवाय अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनीसुद्धा मोदींच्या भाषणाचं कौतुक केलं आहे.
22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर 6 आणि 7 मे दरम्यान भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केलं. त्यानंतर 10 मे रोजी पाकिस्तानच्या विनंतीनंतर शस्त्रसंधी मान्य केला असला तरी त्याची सर्वप्रथम घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानने अण्वस्त्र वापरण्याची कथितरित्या धमकी दिल्यामुळे ट्रम्प प्रशासनाने मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी दिलेला इशारा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दहशतवादविरोधी कारवाईत पाकिस्तान सरकार आणि लष्कराने दहशतवाद्यांनाच साथ दिल्याचा घणाघात मोदींनी केला. इतकंच नव्हे तर दहशतवाद आणि चर्चा, दहशतवाद आणि व्यापार, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत, असं सांगताना यापुढे पाकिस्तानशी चर्चा ही केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर परत करणं या दोनच मुद्द्यांवर होईल, असं मोदी यांनी जागतिक समुदायाला ठणकावलं आहे.