News9 Global Summit: न्यूज 9 च्या मंचावर सुनील शेट्टींकडून प्रसिद्ध अभिनेत्याचे कौतुक, म्हणाले मी घाबरतो…
न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये अभिनेते सुनील शेट्टी यांनी विनीत कुमार सिंहच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं. त्यांनी म्हटलं की विनीतच्या अभिनयाने ते नर्व्हस झाले. विनीतने "छावा" चित्रपटातील कविता समिटमध्ये वाचली, जी सुनील शेट्टींना अतिशय प्रभावित करणारी ठरली.

टीव्ही 9 नेटवर्कतर्फे दुबईमध्ये ‘न्यूज 9 ग्लोबल समिट’ पार पडत आहे. या न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये कोट्यावधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते सुनील शेट्टी यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी एका अभिनेत्याचं नाव घेतलं, ज्याच्या अभिनयाने सुनील शेट्टी स्वत: नर्व्हस झाले. त्या अभिनेत्याचं नाव म्हणजे विनीत कुमार सिंह. विनीतही या समिटमध्ये सहभागी झाले होते. सुनील शेट्टींनी न्यूज 9 ग्लोबल समिटच्या मंचावरुन त्यांचं जोरदार कौतुक केलं.
मी विनीतचा अभिनय बघून थोडा घाबरलो. त्याची अभिनय शैली पाहून मला डायलॉग बोलायलाही भीती वाटत आहे. इतक्या मोठ्या ओळी कशा लक्षात ठेवता. मला वाटलं की अभिनयही सुरू आहे आणि चित्रपट सुरू आहे. खूपच छान, अशा शब्दात सुनील शेट्टींनी विनीत सिंहचे कौतुक केले.
‘छावा’मधील कविता मंचावर वाचली
विनीत कुमार यांनी ‘छावा’ चित्रपटात कवी कलश यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांची एक लांबलचक कविता म्हटली होती. त्यांचा तो सीन पाहून अनेकांनी त्यांचं खूप कौतुक केलं होतं. जेव्हा विनीत न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांनी ‘छावा’मधील तीच कविता मंचावर वाचली. सुनील शेट्टी त्याच हॉलमध्ये बसले होते, जिथे हा कार्यक्रम सुरू होता.
जेव्हा सुनील शेट्टी यांचा सेगमेंट सुरू झाला. ते स्टेजवर आले, तेव्हा त्यांनी विनीतचं कौतुक करायला सुरुवात केली. मी जेव्हा विनीतला कविता वाचताना पाहिलं, तेव्हा मला वाटलं की पूर्ण चित्रपटच सुरू आहे. पण ती संपूर्ण कविता त्याला आठवत होती. विनीतला ही कविता कशी आठवते, हे पाहून मी आश्चर्यचकित झालो, असेही सुनील शेट्टी म्हणाले.
छावा चित्रपटाची 800 कोटींहून अधिक कमाई
मी स्टेजवर येण्यापूर्वी यांचं हिंदी आणि संवाद ऐकून नर्व्हस झालो होतो. मी काय बोलणार” असेही सुनील शेट्टींनी म्हटले. ‘छावा’मध्ये विनीतच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. हा चित्रपट मराठा सम्राट संभाजी महाराज यांच्यावर आधारित होता. विकी कौशल मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने जगभरात ८०० कोटींहून अधिक कमाई केली. ‘छावा’नंतर विनीत सनी देओलसोबत ‘जाट’ या चित्रपटातही दिसले. त्या चित्रपटातही लोकांना ते खूप आवडले.
