
Sunjay Kapur Property Dispute : अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि दिवंगत बिझनेसमन संजय कपूरच्या संपत्तीचा वाद कोर्टात पोहोचला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणी आज (गुरुवार) सुनावणी झाली. संजयची पत्नी प्रिया सचदेव कपूर हिच्यावर करिश्मा कपूरची मुलं, संजयची आई आणि बहीण यांनी काही आरोप केले आहेत. प्रियाने संजयचं मृत्यूपत्र लपवून फसवणूक केल्याचं त्यांनी म्हटलंय. याप्रकरणी करिश्माच्या मुलांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने प्रियाला संजयच्या संपूर्ण संपत्तीची माहिती देण्याचे आदेश दिले होते. आता प्रियाने संजय कपूरच्या संपत्तीची यादी एका सीलबंद लिफाफ्यात सादर करण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली आहे.
“माझी एकच विनंती आहे की मृत्यूपत्र सीलबंद लिफाफ्यात दाखल करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून ही माहिती जनतेला आणि माध्यमांना उपलब्ध होणार नाही”, अशी मागणी सुनावणीदरम्यान प्रियाच्या वकिलांनी कोर्टाकडे केली. त्यावर न्यायाधीशांनी त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला. “जेव्हा तुम्ही कोणत्याही खटल्यात लेखी उत्तर दाखल करता तेव्हा दुसऱ्या पक्षाला प्रतिदावा करण्यासाठी ही माहिती आवश्यक असते. सीलबंद लिफाफ्यात तुम्ही किती माहिती देणार”, असा सवाल न्यायाधीशांनी केला. त्यावर प्रियाच्या वकिलांनी सांगितलं, “त्यातील बरीच माहिती सार्वजनिक केली जाऊ नये. मी ती सर्वांसोबत शेअर करण्यास तयार आहे. फक्त ती गोपनीय ठेवा.” या विनंतीला न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.
न्यायाधीशांच्या नकारानंतर प्रियाच्या वकिलांनी फक्त दोन पानं सीलबंद लिफाफ्यात ठेवण्याची मागणी केली. त्यावरही न्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितलं की, हे कठीण आहे. कारण समोरच्या पक्षाला मालमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार आहे. जर त्यांना चौकशी करायची असेल आणि गोपनीयतेच्या कराराने ते बांधील असतील, तर ते स्वत:चं रक्षण कसं करतील, असा सवाल न्यायाधीशांनी प्रियाच्या वकिलांना केला. न्यायाधीशांच्या या प्रश्नांवर प्रियाच्या वकिलांनी ‘आम्ही उद्या काही सूचना घेऊन येऊ’ असं म्हणत युक्तिवाद संपवला.
दुसरीकडे संजय कपूरच्या आईचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनीही त्यांची बाजू मांडली. “माझी क्लाएंट क्लास-1 वारस असल्याने आम्हाला स्वतंत्रपणे मृत्यूपत्राची तपासणी करण्याचा अधिकार आहे. गोपनीयता करार या अधिकारावर परिणाम करेल. आम्ही एक प्रत मागितली होती, ती पण देण्यात आली नाही. आम्हाला मृत्यूपत्राची तपासणी करायची आहे”, असं म्हणत त्यांनी मृत्यूपत्राची एक प्रत देण्यात यावी अशी विनंती केली.