
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं. मुंबईतील विलेपार्ले इथल्या पवनहंस स्मशानभूमीवर त्यांच्या अंत्यसंस्कार पार पडले. परंतु धर्मेंद्र यांची अंत्यविधी काढायला हवी होती आणि चाहत्यांना त्यांना अखेरचं पाहण्याची संधी द्यायला हवी होती, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. यामुळे असंख्य चाहते देओल कुटुंबीयांवर नाराज होते. परंतु 8 डिसेंबरला त्यांच्या जन्मदिनी जुहू इथल्या बंगल्याचे दरवाजे चाहत्यांसाठी खुले करून सनी आणि बॉबी देओलने सर्व नाराजी दूर केली. देशाच्या कानाकोपऱ्यातील चाहते सोमवारी मुंबईतील धर्मेंद्र यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी सनी आणि बॉबी देओल यांनी सर्वांनी भेट घेतली आणि हात जोडून त्यांचे आभार मानले.
यावेळी एक चाहता धर्मेंद्र यांच्या आठवणीत अक्षरश: रडू लागला होता. धर्मेंद्र यांच्याशी संबंधित आठवणी तो सांगत होता आणि सनी-बॉबी लक्षपूर्वक ऐकत होते. नंतर त्यांनी चाहत्याला शांत केलं आणि त्याला मिठी मारली. सनी आणि बॉबी देओल यांनी त्या चाहत्यासोबत फोटोसुद्धा क्लिक केला. दोघा मुलांनी वडील धर्मेंद्र यांच्या 90 व्या जन्मदिनी वडिलांच्या जुहू इथल्या घराचे दरवाजे प्रत्येकासाठी खुले केले आणि त्यांच्या चाहत्यांचं मोकळ्या मनाने स्वागत केलं.
वडील धर्मेंद्र यांच्यासाठी चाहत्यांचं अपार प्रेम पाहून सनी आणि बॉबी देओलसुद्धा भावूक झाले होते. दोघं भावंडं त्यांच्या मनात दु:ख आणि डोळ्यात अश्रू घेऊन चाहत्यांना भेटताना दिसले. धर्मेंद्र यांच्या जन्मदिनानिमित्त हेमा मालिनी, ईशा देओल यांनीसुद्धा सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिल्या होत्या.
धर्मेद्र यांच्या अंत्यविधीबद्दल अभिनेता सलमान खानने ‘बिग बॉस 19’च्या ग्रँड फिनालेमध्ये मत व्यक्त केलं होतं. “दोन जणांचा अंत्यविधी आणि शोकसभा अत्यंत व्यवस्थितप्रकारे पार पाडण्यात आलं होतं. एक दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या आईच्या निधनानंतर आणि दुसरं धर्मेंद्र यांच्या निधनानंतर. कुटुंबीयांनी अत्यंत आदरपूर्वक सर्व नियोजन केलं होतं. अर्थात सर्वजण रडत होते, परंतु एक जो आदर आणि जी सभ्यता असायला हवी, आयुष्याचं सेलिब्रेशन जसं असायला हवं.. ते इथे होतं. यासाठी मी सनी, बॉबी आणि सर्व कुटुंबीयांना सलाम करतो. प्रत्येक अंत्यसंस्कार आणि शोकसभा अशाच पद्धतीने पार पडायला हवेत,” असं तो म्हणाला होता.