कोल्हापुरी बाज, बोलायला फटकळ.. सुप्रिया पाठारे पहिल्यांदाच साकारणार राजकारणी
अभिनेत्री सुप्रिया पाठारे लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेत त्या पहिल्यांदाच राजकारणी महिलेची भूमिका साकारणार आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझ्याकडे तुला मागणे’ या मालिकेत अभिनेत्री सुप्रिया पाठारे एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. गेली पंधरा वर्षं ढालगावच्या सरपंचपदावर आपलं वर्चस्व कायम राखणारी हिराबाई ढाले पाटील ही व्यक्तिरेखा त्या साकारणार आहेत. हिराबाईसाठी राजकारण म्हणजे केवळ गावाचा कारभार नाही, तर स्वतःची प्रतिष्ठा आणि वर्चस्व टिकवून ठेवण्याचं साधन आहे. भरपूर पैसा असावा, समाजात मानमरातब असावा आणि आपल्या शब्दाला वजन असावं, ही तिची महत्त्वाकांक्षा! वरकरणी गोड बोलणारी हिराबाई वेळ पडल्यास आपल्या खास कोल्हापुरी ठसक्यात समोरच्याला गप्प करायलाही मागेपुढे पाहत नाही.
‘फॅण्टॅस्टिक’ आणि ‘शिरतंय ताळक्यात’ हे दोन शब्द तिच्या तोंडी नेहमी ऐकायला मिळतात. हिराबाईच्या बोलण्यातला रांगडेपणा, वागण्यातला आत्मविश्वास आणि राजकारणातली धूर्त खेळी यामुळे हिराबाईची व्यक्तिरेखा विशेष ठरणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना सुप्रिया पाठारे म्हणाल्या, “मी पहिल्यांदा राजकारणी भूमिका साकारणार आहे. हिराबाई ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. तिचा कोल्हापुरी बाज, तिची देहबोली आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःचं म्हणणं खरं करण्याची वृत्ती साकारताना खूप मजा येते आहे. ती बोलायला अत्यंत फटकळ असली तरी तिच्या बोलण्यात एक हुशारी आहे. समोरच्याला घोळात घ्यायचं असेल तर बोलण्यात असावी लागणारी नौटंकी आणि समोरच्याला आपल्या टाचेखाली ठेवायचं असल्यास लागणारी धार दोन्हीचा बेमालूम वापर करण्याच कसब तिच्यात आहे. तिच्या या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना नक्कीच आवडतील अशी आशा आहे.”
View this post on Instagram
हिराबाईंच्या राजकीय खेळी आणि तिच्या अनोख्या स्वभावामुळे ‘तुझ्याकडे तुला मागणे’च्या कथानकात कोणते नवे ट्विस्ट येणार हे पाहणं रंजक ठरेल. तुझ्याकडे तुला मागणे ही नवी मालिका रात्री 8 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेत अभिनेता राकेश बापट मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या पात्राचं नाव अभिमान सरदेसाई असणार आहे. अभिमान हा केवळ यशस्वी उद्योजक नसून राजकारणातही सक्रिय असलेला नेता आहे. त्याची प्रतिमा अतिशय प्रामाणिक आणि स्वच्छ आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या आयुष्यातील उद्योजक आणि राजकीय नेता अशा दोन्ही बाजू राकेश आपल्या अभिनयातून कशा प्रकारे उलगडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
