मोठ्या मनाने मला माफ करा..; अंकितासोबतच्या वादावर अखेर सूरज चव्हाणने सोडलं मौन

'बिग बॉस मराठी 5' फेम अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण यांच्यातील वाद सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. सूरजने त्याच्या अकाऊंटवरून अंकितासोबतचे फोटो काढून टाकल्याने नेटकऱ्यांमध्ये त्याची चर्चा होऊ लागली आहे. त्यावर आता सूरजने प्रतिक्रिया दिली आहे.

मोठ्या मनाने मला माफ करा..; अंकितासोबतच्या वादावर अखेर सूरज चव्हाणने सोडलं मौन
Ankita Walawalkar and Suraj Chavan
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 12, 2024 | 3:20 PM

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन जरी संपला असला तरी त्यातील कलाकार मात्र विविध कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर आणि बिग बॉस मराठीचा विजेचा सूरज चव्हाण यांच्यातील वादाने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. बिग बॉस संपल्यानंतर अंकिता तिच्या होणाऱ्या पतीसोबत सूरजला भेटायला त्याच्या गावी गेली होती. तिथे सूरजने तिचं चांगलं स्वागतही केलं होतं. या भेटीनंतर अंकिताने सूरजसोबतचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. या फोटोंसाठी तिने सूरजसोबत कोलॅबरेशनही केलं होतं. मात्र काही तासांतच सूरजच्या अकाऊंटवर अंकितासोबतचे फोटो दिसणं बंद झालं. सूरजने अंकिताचे फोटो स्वत:हून डिलिट केल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. आता पहिल्यांदाच सूरजने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. सूरजच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिण्यात आली. या पोस्टद्वारे त्याने जाहीर माफी मागितली आहे.

सूरज चव्हाणची पोस्ट-

‘नमस्कार मी आपल्या सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण.. माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही प्रॉब्लेम असल्यामुळे काही खूप महत्त्वाच्या पोस्ट डिलीट झाल्या आहेत. त्यामध्ये माझ्या अंकिता ताई आणि जान्हवी ताईच्या पण होत्या. यापुढे मी स्वत: लक्ष देईन आणि काळजी घेईन. तरीही आपणा कुणाचे मन दुखावले असतील तर मोठ्या मनाने मला माफ करा,’ अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.

सूरजने फोटो डिलिट केल्याची गोष्ट नेटकऱ्यांनी अंकिताच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तिनेही त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. पण एक शेवटचं मी तुम्हा सगळ्यांना सांगते की सूरजचं अकाऊंट सूरज हँडल करत नाही. सूरजच्या आजूबाजूच्या लोकांना मी नको असल्या कारणास्तव मी यातून काढता पाय घेत आहे. यापुढे माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात’, असं ती एका पोस्टमध्ये म्हणाली. तर अंकिताने एका युजरला दिलेल्या उत्तराचाही स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यात ती म्हणतेय, ‘आज मलाही अनुभव आलेत. काही गोष्टी त्याच्या त्याला कळू दे. कारण सांगून वाईट होण्यापेक्षा न सांगता लांब राहणंच योग्य आहे या बाबतीत.’

सूरजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मात्र अजूनही अंकिता आणि जान्हवी किल्लेकर यांच्यासोबत फोटो पहायला मिळत नाहीत. तर अंकिताच्या अकाऊंटवर अजूनही सूरजसोबतचे फोटो तसेच दिसतात.