मोदी, शाह, योगींबद्दल काही अडचण नाही, पण काहींना पैसे..; भाजपमध्ये असताना काय घडलं? सुरेश ओबेरॉय यांचा खुलासा

Suresh Oberoi: ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाजप प्रवेशाबद्दल आणि राजकारणातील अनुभवाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. बहुतेक लोकांना फक्त पैसे कमवण्यातच रस असतो, असं ते स्पष्ट म्हणाले.

मोदी, शाह, योगींबद्दल काही अडचण नाही, पण काहींना पैसे..; भाजपमध्ये असताना काय घडलं? सुरेश ओबेरॉय यांचा खुलासा
Suresh Oberoi
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 20, 2026 | 12:08 PM

ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या जुन्या राजकीय प्रवासाबाबत वक्तव्य केलं आहे. 2004 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या काळातील अनुभव, राजकारणात येण्यामागची भूमिका आणि सध्याच्या राजकीय नेत्यांबद्दलचं मत त्यांनी या मुलाखतीत स्पष्टपणे मांडलं आहे. निधी वासंदानी यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ओबेरॉय यांनी 2004 मध्ये भाजपशी त्यांची ओळख कशी झाली, याविषयी सांगितलं. त्याचसोबत सक्रिय राजकारणातील त्यांची रुची अखेरीस का कमी झाली, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलचा आदर आजही कायम असल्याचं सुरेश ओबेरॉय यांनी सांगितलं.

भाजपमध्ये प्रवेश

राजकारणात प्रवेश करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना सुरेश ओबेरॉय म्हणाले की, हैदराबादमधील त्यांच्या एका कॉलेज मित्रानेच त्यांना सर्वप्रथम भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला होता. “हैदराबादमधील माझ्या कॉलेजमध्ये माझा एक मित्र होता. एकेदिवशी तो घरी आला आणि मला म्हणाला, ही भारतीय जनता पार्टी आहे. तू त्यात सामील व्हायला पाहिजेस. ही 2004 सालची गोष्ट आहे”, असं ओबेरॉय यांनी सांगितलं. 2004 मध्ये भाजपशी जोडले गेल्यानंतर त्यांनी पक्षाच्या प्रचारातही सहभाग घेतला होता. याच काळात त्यांची लालकृष्ण अडवाणी आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांशी भेट झाली होती.

गुरूंचा सक्त सल्ला

मात्र आपल्या गुरूंना भेटल्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला वेगळं वळण मिळालं. गुरूंनी राजकारणात प्रवेश न करण्याचा सक्त सल्ला दिल्याचा खुलासा ओबेरॉय यांनी या मुलाखतीत केला. “त्यांनी मला खूप कडक शब्दांत सुनावलं. मी माझ्या आयुष्यात त्यांना कोणालाही असं सुनावताना कधीही पाहिलं नव्हतं. ते मला म्हणाले, काळजी घे. राजकारणात कधीही जाऊ नकोस आणि या लोकांशी संपर्कसुद्धा ठेवू नकोस”, असं ओबेरॉय म्हणाले. राजकारणातील प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर ओबेरॉय यांच्या मनात काही वेगळे प्रश्न निर्माण झाले.

राजकारणापासून दूर का गेले?

“मला आतून आनंद वाटत नव्हता. माझं मन त्यात रमत नव्हतं. मला तिथे चांगली ऊर्जाही जाणवत नव्हती. मोदीजी, अमित शाह, योगी आदित्यनाथजी आणि इतर काही जणांबद्दल मला काही अडचण नाही, पण त्यांच्या आजूबाजूच्या अनेक लोकांबद्दल मला काहीतरी विचित्र वाटलं. ते मला खरे वाटले नाही. मला वाटायचं की राजकारण म्हणजे देशासाठी काहीतरी करणं. नंतर माझ्या लक्षात आलं की बहुतेक लोकांना फक्त पैसे कमवण्यातच रस असतो”, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.

या मुलाखतीत सुरेश ओबेरॉय यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलही आपली भूमिका स्पष्ट केली. मोहन भागवत यांच्याबद्दल आपल्या मनात विशेष आदर असून त्यांचे चाहते असल्याचंही त्यांनी सांगितलं. याविषयी ते पुढे म्हणाले, “मी नेहमीच आरएसएसचा आणि मोहन भागवतजींचा चाहता राहिलो आहे. ते एकदा माझ्या घरी नाश्त्यासाठी आले होते. माझी पत्नी खूप छान हलवा बनवते. आम्ही त्यांना तो दिला आणि त्यांनाही तो खूप आवडला होता. मी आजही भागवतजींच्या संपर्कात आहे. पण मी आरएसएसमध्ये औपचारिकपणे सहभागी झालेलो नाही.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us