Donald Trump : ते तसे नव्हते..; डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल सुष्मिता सेनचं मत चर्चेत

अभिनेत्री सुष्मिता सेनने विविध चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. 1994 मध्ये तिने 'मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकला होता. त्याच्या काही वर्षांनंतर तिने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काम केलं होतं.

Donald Trump : ते तसे नव्हते..; डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल सुष्मिता सेनचं मत चर्चेत
Sushmita Sen and Donald Trump
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 13, 2025 | 1:15 PM

सुष्मिता सेन ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने विविध चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत तिने ‘मिस युनिव्हर्स’चा किताबही जिंकला आहे. त्यावेळी सुष्मिताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काम केलं होतं. एका मुलाखतीत सुष्मिता त्यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. 2010 ते 2012 या कालावधीत ‘मिस युनिव्हर्स’च्या फ्रँचाइजीची मालक म्हणून तिने ट्रम्प यांच्यासोबत काम केलं होतं. 1994 मध्ये सुष्मिताने ‘मिस युनिव्हर्स’ या अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेत बाजी मारली होती.

सौंदर्यस्पर्धा जिंकल्यानंतर विजेतीला विविध ब्रँड्सकडून आणि संस्थांकडून जाहिरातींचे ऑफर्स येतात. सुष्मितालाही ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकल्यानंतर संस्थेकडून फोन आला होता. त्यावेळी ती रेनी ज्वेलर्स या ब्रँडसाठी काम करत होती आणि इतरही अनेक जाहिराती सांभाळत होती. संस्थेकडून आलेल्या कॉलबद्दल ती म्हणाली, “मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनने मला फोन केला आणि विचारलं, तुला फ्रँचाइजी घ्यायला आवडेल का? मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी म्हटलं, काय? खरंच का? ते एखाद्या स्वप्नासारखंच होतं.” फ्रँचाइजी स्वीकारली तेव्हा त्या कराराचे नियम आणि अटी अत्यंत कठोर होत्या, असाही खुलासा सुष्मिताने केला होता.

ती फ्रँचाइजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीची होती, त्यामुळे त्यात सोपं किंवा मजेदार असं काहीच नव्हतं, असं सुष्मिताने स्पष्ट केलं. या मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आलं की त्यावेळी ट्रम्प तिचे बॉस होते का? त्याला तिने नकारार्थी उत्तर दिलं. सुष्मिता म्हणाली, “त्यावेळी फक्त पॅरामाऊंट कम्युनिकेशन आणि मॅडिसन स्क्वेअर गार्डन माझे बॉस होते, कारण जेव्हा मी वर्षभरासाठी मिस युनिव्हर्सची कर्मचारी होती, तेव्हा मिस युनिव्हर्सची संस्था त्यांच्या मालकीची होती.”

डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्रँचाइजीसाठी काम करत असल्याने सुष्मिताची त्यावेळी त्यांच्याशी भेट झाली होती. परंतु त्या भेटीबद्दल तिने फार तपशीलवार माहिती दिली नाही. परंतु ट्रम्प यांच्याबद्दल ती म्हणाली, “काही लोक भेटीदरम्यान त्यांची विशेष छाप सोडतात. ही छाप त्यांच्या कामामुळे किंवा ताकदीमुळे नाही तर त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे सोडली जाते. ट्रम्प मात्र तसे नव्हते.”