Suvrat Joshi | लंडनमध्ये मराठी चित्रपटाचे डबिंग, सुव्रत जोशीने शेअर केला ‘क्रेझी’ अनुभव!

लॉकडाऊनपूर्वी चित्रीत केलेल्या 'गोष्ट एका पैठणी'ची या चित्रपटाचे राहिलेले डबिंग सुव्रतने चक्क लंडनमध्ये पूर्ण केले.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:56 PM, 5 Oct 2020
Suvrat Joshi | लंडनमध्ये मराठी चित्रपटाचे डबिंग, सुव्रत जोशीने शेअर केला ‘क्रेझी’ अनुभव!

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. यादरम्यान अभिनेता सुव्रत जोशीनेही (Suvrat Joshi) त्याचा एक क्रेझी अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. लॉकडाऊनपूर्वी चित्रीत केलेल्या ‘गोष्ट एका पैठणी’ची या चित्रपटाचे राहिलेले डबिंग (Dubbing) त्याने चक्क लंडनमध्ये (London) पूर्ण केले. या डबिंगवेळी दिग्दर्शक शंतनू रोडे ‘झूम’द्वारे ऑनलाइन उपस्थित असायचे. तर, लंडनमधील डबिंग स्टुडिओतील बांगलादेश आणि पोलंडच्या तंत्रज्ञांच्या मदतीने हे डबिंग पूर्ण झाले (Suvrat Joshi is dubbing a Marathi film Gosht eka paithanichi in London).

‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाचे चित्रीकरण लॉकडाऊनपूर्वीच पूर्ण झाले होते. शासनाने अनलॉकिंग सुरू केल्यावर चित्रपटाच्या डबिंगची (Dubbing) प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार बाकी सर्व कलाकारांचे डबिंग पूर्ण झाले. मात्र, सुव्रत जोशी (Suvrat Joshi) लंडनमध्ये अडकल्याने त्याला मुंबईत येऊन डबिंग करणे शक्य होत नव्हते. अखेर तंत्रज्ञानामुळे या अडचणींवर मार्ग निघाला, असे चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले.

लंडनमध्ये मराठी चित्रपटाचे डबिंग करण्याच्या अनुभवाविषयी…

लंडनमध्ये मराठी चित्रपटाचे डबिंग करण्याच्या अनुभवाबद्दल सांगताना सुव्रत म्हणतो, ‘माझ्या नाटकाच्या दौऱ्यासाठी मी अमेरिकेला गेलो होतो. पण कोरोना संसर्गामुळे दौरा स्थगित करावा लागल्याने मी लंडनला (London) गेलो. दरम्यान लॉकडाऊन घोषित झाल्याने तिथेच अडकलो. त्यामुळे ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाचे माझ्या वाटचे डबिंग (Dubbing) करता येत नव्हते. निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी धाडसी निर्णय घेऊन मला लंडनमध्ये डबिंग करायला सांगितले. त्यानुसार, आम्ही लंडनमध्ये एक स्टुडिओ शोधला आणि त्यांची मदत घेऊन डबिंग पूर्ण केले.’

‘या डबिंगसाठी दिग्दर्शक शंतनू रोडे झूमद्वारे ऑनलाईन उपस्थित असायचे. पण, स्टुडिओतल्या तंत्रज्ञांपैकी एक जण बांगलादेशातील आणि एक जण पोलंडमधील होते. त्यांना मराठी येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे भाषेचा अडथळा येत होता. पण त्यातूनही डबिंग उत्तम पद्धतीने झाले हा अनुभव खरोखरच क्रेझी होता’, असे सुव्रत जोशी म्हणाला. (Suvrat Joshi is dubbing a Marathi film Gosht eka paithanichi in London)

अभिनेत्री सायली संजीव दिसणार मुख्य भूमिकेत

प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाईड प्रोडक्शन यांनी संयुक्तरित्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

(Suvrat Joshi is dubbing a Marathi film Gosht eka paithanichi in London)