मुस्लीमशी लग्न करून जाड-कुरुप झालीस.. म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीचं उत्तर, ‘शिव्या खायची सवयच..’

मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्यानंतर जाड आणि कुरूप झालीस, अशा टीकांना सतत सामोरं जावं लागत असल्याचा खुलासा या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला आहे. बॉडी शेमिंग करणाऱ्यांना आता या अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिलं आहे.

मुस्लीमशी लग्न करून जाड-कुरुप झालीस.. म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीचं उत्तर, शिव्या खायची सवयच..
बॉलिवूड अभिनेत्री
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 12, 2026 | 10:22 AM

आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिने फहाद अहमदशी आंतरधर्मीय लग्न केलं. स्वरा हिंदू असून मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्याने तिच्यावर अनेकदा टीका झाली. इतकंच नव्हे तर बाळंतपणानंतर वाढत्या वजनामुळेही तिला ‘बॉडी शेमिंग’चाही सामना करावा लागला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वराने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. या पॉडकास्ट मुलाखतीत स्वरा तिच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत आणि बॉडी शेमिंगसह इतरही मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाली.

“या लोकांकडे किती मोकळा वेळ आहे पहा. माझं आयुष्य त्यांच्यामुळे चालत नाही. जर तुम्हाला सेक्सी मुली पहायच्या असतील तर दुसऱ्या पेजवर जा. माझ्या पेजवर तुम्हाला कोणी बोलावलं आहे? अडीच वर्षांपूर्वी मला बाळ झालं आणि बाळंतपणानंतर स्त्रियांच्या शरीरात बदल होतात. मला माहितीये की मी अशा इंडस्ट्रीतून येते, जिथे प्रत्येकजण तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी धडपडत असतो. बोटॉक्स, इंजेक्शन्स, प्लास्टिक सर्जरी.. पण सत्य हेच आहे की आयुष्य बदलत राहतं. बदल हा नियमच आहे. 45 वर्षांचा माणूस जर 16 वर्षांच्या तरुणाप्रमाणे वागू लागला तर तुम्हालाच आश्चर्यच वाटेल. मी तर आयुष्यात असंही खूप शिव्या खाल्ल्या आहेत आणि मला त्याची सवय आहे. पण जेव्हा तुम्हाला बाळ होतं, तेव्हा तुम्ही अधिक संवदेनशील होता”, अशा शब्दांत स्वरा व्यक्त झाली.

स्वराने या मुलाखतीत एक किस्सासुद्धा सांगितला. पती फहाद अहमदसोबत ती एका निवडणूक प्रचारात विना मेकअप गेली होती. त्यावेळी तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. त्या फोटोवरून आजसुद्धा प्रचंड ट्रोलिंग होत असल्याचं तिने सांगितलं. याविषयी ती पुढे म्हणाली, “माझा जुना फोटो आणि आताच्या फोटोची तुलना करून डिवचलं जातं की, मुस्लीम व्यक्तीशी लग्न करून अशी अवस्था झाली. मुस्लीमशी लग्न करून जाडी, कुरूप झाली. अशा कमेंट्स वाचून फहादलाही वाईट वाटतं. पण मीसुद्धा हट्टी आहे. मी माझं वजन कमी करणार नाही, अशीच जाड राहीन. माझ्या इन्स्टाग्राम पेजवर मी अशी हॅपी हिप्पोसारखी दिसेन.”

“आमच्या इंडस्ट्रीत किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक कामात महिलांवर एक वेगळाच दबाव असतो. आपण असंच दिसलं पाहिजे, सुंदर दिसलं पाहिजे.. वगैरे. हे पाहून मला खूप वाईट वाटतं. बाळंतपणानंतर स्त्रियांना अनेक गोष्टींमधून जावं लागतं. त्यात लोकांना वाटतं की हिने बारिक व्हायला पाहिजे. जर तुम्ही स्तनपान करत असाल तर तुम्हाला जास्त कॅलरीजची गरज असते”, असं मत स्वराने मांडलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us