रिल्सच्या जमान्यात शॉर्टकट वापरू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा Gen-Z ला कानमंत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Gen-Z ला रिल्सच्या शॉर्टकटपासून दूर राहण्याचा कानमंत्र दिला आहे. रामनाथ कोविंद यांच्या आत्मचरित्र प्रकाशनावेळी ते म्हणाले की, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सच्या मागे न लागता, महापुरुषांची आत्मचरित्रे वाचून आयुष्यात पुढे जा. कष्टाने मिळवलेले यशच खरे असते, शॉर्टकटने नुकसान होते, असा त्यांचा तरुणाईला महत्त्वाचा संदेश होता.

सध्या रिल्सचा जमाना आहे. सोशल मीडियावरील इन्फ्ल्युएंसर्सला तरुण आकर्षित होतात. कोणत्याही मार्गाने जातात. पण रिल्सच्या जमान्यात शॉर्टकटचा मार्ग अवलंबू नका. तुम्हाला आवडत्या व्यक्तींचें आत्मचरित्र वाचा. त्यातून तुमच्यासमोर इतिहासाचा एक कालखंड उलगडला जातो, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Gen-Zला दिला आहे.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ‘ट्रिम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाइफ, माय स्ट्रगल्स’ या आत्मचरित्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मोदींनी रामनाथ कोविंद यांचा जीवन संघर्ष मांडतानाच कोविंद यांच्या कार्याचं कौतुकही केलं. तसेच त्यांच्या पुस्तकातील एक एक पदर उलगडवून दाखवले. तसेच जेनजींनाही खास संदेश दिला. तरुणांना आवाहन करतो. रिल्सचा जमाना आहे. सोशल मीडिया इन्फ्ल्यूअन्सर तुम्हाला कुठेही घेऊन जातात. शॉर्ट कटचा मार्ग अवलंबू नका. या शॉर्टकटच्या जमान्यात तरुणांनी सावध राहिलं पाहिजे, असं मोदी म्हणाले.
शॉर्टकट ऐवजी आत्मचरित्र वाचा
यावेळी मोदींनी रेल्वे स्टेशनवर लिहिल्या जाणाऱ्या एका ओळीची आठवण करून दिली. स्थानकावरही लोक पुलावरून जाण्या ऐवजी पटरीवरून जाण्याचा प्रयत्न करतात. पण “A shortcut will cut you short.” म्हणजे चुकीचा शॉर्टकट तुमचं नुकसान करू शकतो, असं सांगतानाच जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकायचं असेल, तर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीचं आत्मचरित्र वाचा. आत्मचरित्र त्या कालखंडातील इतिहासातील घटना समजण्यास मदत करतात, असा कानमंत्र त्यांनी दिला.
नव्या पिढीने आवश्य वाचावं
कोविंद यांच्याशी माझे जुने संबंध आहे. राष्ट्रपती म्हणून त्यांनी मला नेहमी मार्गदर्शन केलं. कोविंद यांचा जीवनप्रवास, समाज आणि राष्ट्रासाठीचं त्यांचं योगदान अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबाबत मी जास्त बोलू शकतो. पण तुम्ही सर्वांनी त्यांचं पुस्तक वाचून लाभ घ्यावा हे अधिक चांगलं होईल. कोविंद यांचा जीवन प्रवास त्यांच्या शब्दातून जाणून घ्या. त्यांचा अनुभव नव्या पिढीने वाचावा. त्यातून नव्या पिढीला बरंच काही शिकायला मिळेल, असं त्यांनी सांगितलं. कोविंद यांनी त्यांच्या पुस्तकाला अत्यंत अचूक नाव दिलं आहे. जीवन आणि जीवनाचे संघर्ष त्यांचे व्यक्तिगत आहे. पण त्या संघर्षामुळे मिळालेली जीत भारताच्या स्वातंत्र्याची आहे. भारताच्या लोकशाहीची आहे, असंही ते म्हणाले.
आजही आईची आठवण येते
एक मानवी स्वभाव असतो, काही लोक आपल्या यशाचे श्रेय स्वत:कडे घेतात आणि अपयशाचं खापर समाजावर फोडतात. पण काही लोक आपल्या यशात समाजाला भागिदार मानतात. त्यापैकी कोविंद एक आहेत. कोविंद एका सामान्य कुटुंबातून आले. उन्हाळ्यात त्यांच्या घराला आग लागली. त्यांची आई आपली चिंता सोडून घरातील वस्तू सावरत होती. एका सामान्य कुटुंबात आईसाठी एक एक गोष्ट मुलांच्या पालनपोषणाचा मार्ग आहे. त्याच प्रयत्नात आगीत सापडून त्यांच्या आईचा मृत्यू झाला. एका कमी वयात अशा प्रकारची घटना घडणं, आईला अशा पद्धतीने गमावणं किती दु:खद असेल. मी भाग्यशाली आहे की, माझी आई शंभर वर्षाहून अधिक काळ जगली आणि मला आशीर्वाद देत राहिली. तरीही मला आजही आईची उणीव जाणवते, असं सांगताना मोदी भावूक झाले.
मेहनतीनेच शिखरावर
कोविंद यांनी आपल्या आयुष्यात मेहनत केली. आणि एका शिखरावर बसले, त्याची कल्पना कुणीच केली नसेल. ते भारतासारख्या विशाल देशाचे राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती झाल्यावरही त्यांनी विनम्रता सोडली नाही. राष्ट्रपती झाल्यानंतर गावात गेले. तिथे गेल्यावर गुरुंचे आशीर्वाद घेतले. गावाच्या मातीचं दर्शन घेतलं आणि गावातील लोकांचे आभार मानले. देशाने हे भावूक दृश्य पाहिलं, अशी आठवण त्यांनी यावेळी काढली.
