डोके फिरू सेन्सॉर बोर्डावर कारवाई करा; नामदेव ढसाळ यांच्या पत्नीची मागणी
नुकताच नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका ढसाळ यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या डोके फिरू अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

‘चल हल्ला बोल’ या चित्रपटात बंडखोर कवी आणि दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या कविता वापरण्यात आल्या आहेत. जेव्हा हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडे सबमिट करण्यात आला तेव्हा सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी या कवितांवर आक्षेप घेतला होता. तसेच त्यांना या नामदेव ढसाळ यांच्या कविता असल्याचे सांगताच त्यांनी ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही’ असा प्रश्न उपस्थित केला होता. सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी विचारलेला प्रश्न पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आता नामदेव ढसाळ यांची पत्नी मल्लिका ढसाळ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
मल्लिका ढसाळ यांनी नुकताच एक पत्रपकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सेन्सॉर बोर्डाला चांगेलच सुनावले आहे. ‘थोर पुरुषांचा अपमान टाळण्यासाठी मराठी सिनेमा सेन्सॉर बोर्डवर योग्य व्यक्ती असावे ज्यांना मराठी भाषेचा सन्मान असेल, माहिती असेल’ असे मल्लिका ढसाळ म्हणाल्या.
पुढे मल्लिका यांनी ‘चल हल्ला बोल’ चित्रपटाविषयी देखील मोठा खुलासा केला आहे. दिग्दर्शकाने कोणतीही परवानगी न घेता नामदेव ढसाळ यांच्या कविता वापरल्याचा खुलासा देखील त्यांनी केला आहे. ‘इतकी भयंकर वेळ माझ्यावर आली आहे. हे अत्यंत यानादायी आहे. मराठीचा अपमान आहे. मराठीचा झेंडा जगात लावला आहे तो माणूस कोण असं कसं विचारू शकता. त्या माणसाचे तातडीने निलंबन करावे. अकलेची दिवाळखोरी आहे. गैरफायदा घेण्याचा कोणाला अधिकार नाही. हल्ला बोल सिनेमा माझ्या परवानगीशिवाय केला आहे. यामध्ये नामदेव ढसाळ यांच्या कविता वापरल्या आहेत. मी कायदेशीर कारवी करणार’ असे त्या म्हणाल्या.
काय आहे प्रकरण?
‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट १ जुलै २०२४ रोजी मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डकडे सबमिट करण्यात आला होता. पण चित्रपटातील कवितांमध्ये शिव्या आणि अश्लीलता असल्याचे मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मांडले. त्यानंतर या कविता नामदेव ढसाळ यांनी लिहिल्याची माहिती देण्यात आली होती. त्यावर अधिकाऱ्यांनी, ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही’ असे उत्तर दिल्याचे समोर आले.
