देवा घरी स्वत:ची काळजी घे रे.. मित्रांसह नेटकऱ्यांनाही शॉक; सुप्रसिद्ध रील स्टारच्या निधनावर सोशल मीडिया हळहळला

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार प्रथमेश कदमच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. प्रथमेशचा जवळचा मित्र आणि इन्फ्लुएन्सर तन्मय पाटेकरने सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

देवा घरी स्वत:ची काळजी घे रे.. मित्रांसह नेटकऱ्यांनाही शॉक; सुप्रसिद्ध रील स्टारच्या निधनावर सोशल मीडिया हळहळला
प्रथमेश कदम, तन्मय पाटेकर
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 26, 2026 | 1:45 PM

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार प्रथमेश कदम यांचं निधन झालं आहे. आजारपणामुळे त्याने आपले प्राण गमावल्याची माहिती समोर येत आहे. प्रथमेशच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. डिसेंबर महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने आजारपणाबद्दल सांगितलं होतं. परंतु त्यानंतर इतक्या लगेच तो हे जग सोडून जाईल, याची कल्पनासुद्धा कोणी केली नव्हती. प्रथमेश त्याच्या आईसोबत इन्स्टाग्रामवर रील्स पोस्ट करायचा आणि त्याला नेटकऱ्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत होता. मायलेकाची जोडी चाहत्यांमध्ये लोकप्रिय होती. आता प्रथमेशचा जवळचा मित्र तन्मय पाटेकरने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

तन्मय पाटेकरची पोस्ट-

‘तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश.. देवाघरी स्वत:ची काळजी घे रे. खूप आठवण येईल तुझी, मिस यू भाई,’ अशा शब्दांत तन्मयने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये तन्मयने प्रथमेशच्या अंत्ययात्रेबद्दलचीही माहिती दिली आहे. अंत्ययात्रा सकाळी 9.30 वाजता राहत्या घरून निघेल, असं त्याने लिहिलं आहे. यासोबतच त्याने घरचा पत्तासुद्धा दिला आहे. मालाड पूर्व इथल्या राहत्या घरातून प्रथमेशची अंत्ययात्रा निघणार आहे. तन्मयच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘काय झालं अचानक, हे धक्कादायक आहे’ असं एकाने लिहिलं आहे. तर ‘प्रथमेश.. खूप घाई केलीस’ असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘कायम आठवणीत राहशील.. खूप मोठा धक्का बसलाय’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

वडिलांच्या निधनानंतर प्रथमेशने त्याच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती. त्याने आईलाही धीर दिला होता. आईसोबत मिळून तो सोशल मीडियावर रील पोस्ट करू लागला होता आणि त्याला नेटकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत होता. मायलेकाची जोडी सोशल मीडियावर पसंतीस उतरली होती. इन्स्टाग्रामवर प्रथमेशचे 1 लाख 85 हजारांहूनही अधिक फॉलोअर्स आहेत. आधी पती आणि आता पोटच्या मुलाचं निधन झाल्यामुळे प्रथमेशच्या आईवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.