प्रसिद्ध अभिनेत्रीला चौथ्या स्टेजचा कॅन्सर, पण त्यापेक्षाही जास्त चिंता त्या दोघींची..

प्रसिद्ध अभिनेत्रीला चौथ्या स्टेजच्या कॅन्सरचं निदान झालं आहे. तिच्या वडिलांचंही कॅन्सरने निधन झालं होतं. 70 वर्षांची आई आणि 9 वर्षांची मुलगी माझ्यावर पूर्णपणे अवलंबून असल्याचं तिने म्हटलंय. सोशल मीडियावर तिने भावूक पोस्ट लिहिली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीला चौथ्या स्टेजचा कॅन्सर, पण त्यापेक्षाही जास्त चिंता त्या दोघींची..
तनिष्ठा चॅटर्जी
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 25, 2025 | 11:13 AM

बॉलिवूड चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारलेली अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीला कॅन्सरचं निदान झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने याबद्दलची माहिती दिली आहे. तनिष्ठाला चौथ्या स्टेजचं ऑलिगो मेटास्टेटिक कॅन्सरचं निदान झालं आहे. तिच्या वडिलांचंही कॅन्सरने निधन झालं होतं. त्याच्या आठ महिन्यांतच तिला हा धक्का बसला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित तिने या कठीण काळात साथ देणाऱ्या मैत्रिणींचे विशेष आभार मानले आहेत. 70 वर्षांची आई आणि 9 वर्षांची मुलगी माझ्यावर पूर्णपणे अवलंबून असल्याचंही तिने सांगितलं आहे.

तनिष्ठा चॅटर्जीची पोस्ट-

‘सौम्यपणे सांगायचं झालं तर, गेले 8 महिने माझ्यासाठी अत्यंत कठीण होते. एकीकडे कॅन्सरमुळे वडिलांना गमावल्याच्या दु:खातून सावरत असतानाच आठ महिन्यांपूर्वी मलासुद्धा चौथ्या स्टेजच्या मेटास्टेटिक कॅन्सरचं निदान झालं. पण ही पोस्ट दु:खाबाबतची नाही, तर प्रेम आणि ताकदीबाबतची आहे. यापेक्षा अजून काही वाईट होऊ शकलं नसतं. 70 वर्षांची आई आणि 9 वर्षांची मुलगी.. दोघीही पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहेत’, असं तिने लिहिलंय.

या पोस्टमध्ये तिने पुढे म्हटलंय, ‘आयुष्यातील या सर्वांत वाईट क्षणांमध्ये मला एक असाधारण प्रेम सापडलं. एक असं प्रेम जे तुमच्या मदतीला धावून येतं, सुरक्षित जागा तयार करतं आणि तुम्हाला कधीच एकटं वाटू देत नाही. अशा प्रकारचं प्रेम मला माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये सापडलंय. त्यांचा खंबीर पाठिंबा असल्यामुळे मी या कठीण दिवसांतही चेहऱ्यावर हास्य आणू शकले. आजच्या AI आणि रोबोट्समागे धावण्याच्या जगात खऱ्या आणि उत्साही माणसांची करुणाच मला वाचवतेय. त्यांची सहानुभूती, त्यांचे संदेश, त्यांची उपस्थिती, त्यांची माणूसकीच मला जगण्याची नवी उमेद देतेय. महिलांच्या मैत्रीला, माझ्यासाठी प्रेम, सहानुभूती आणि शक्ती दाखवलेल्या बहिणीसारख्या या नात्याला सलाम. मी त्यांची खूप आभारी आहे ‘

तनिष्ठाने तिच्या या पोस्टमध्ये शबाना आझमी, दिया मिर्झा, कोंकना सेन शर्मा, दिव्या दत्ता, उर्मिला मातोंडकर, रिचा चड्ढा, सहाना गोस्वामी, अली फजल, सुनिता राजवर यांसारख्या सेलिब्रिटींचा उल्लेख केला आहे. त्यांच्यासोबतचा एक फोटोसुद्धा तिने शेअर केला आहे. तर दिया मिर्झा, संध्या मृदुल, स्वानंद किरकिरे, शारीब हाश्मी यांनी कमेंट करत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.