Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅन्सर.. नुसतं ऐकलं तरी धडकी भरते; तरीही योग्य मदतीने करू शकता मात, जाणून घ्या सर्वकाही..

कॅन्सर... हा शब्द जरी ऐकला तरी धडकी भरते. अनेकांना हा आपल्या नियंत्रणापलीकडचा आजार वाटतो. मात्र सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत असे अनेक केसेस आहेत, ज्यामध्ये रुग्णांनी कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली. याच आजाराविषयी आपण या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात..

कॅन्सर.. नुसतं ऐकलं तरी धडकी भरते; तरीही योग्य मदतीने करू शकता मात, जाणून घ्या सर्वकाही..
कॅन्सरशी यशस्वी झुंज दिलेले आणि देणारे सेलिब्रिटीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 07, 2025 | 11:13 AM

भारतातील लोकांच्या आरोग्याबाबत केलेल्या नव्या अभ्यासाचा अहवाल चिंता वाढवणारा आहे. असंसर्गजन्य आजारांसोबतच (NCDs) देशात कॅन्सरच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होतेय. गेल्या वर्षी जागतिक आरोग्य दिनानिमित्त अपोलो रुग्णालयाने एका अभ्यासाचा अहवाल जारी केला. त्यात त्यांनी भारताचा उल्लेख ‘जगातील कर्करोगाची राजधानी’ असा केला. आरोग्याच्या बाबतीत समोर येणारी आकडेवारीसुद्धा विचार करायला भाग पाडणारी आहे. एक तृतीयांश भारतीय प्री-डायबेटिक आहेत, दोन तृतीयांश लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आणि दर दहापैकी एक नैराश्यग्रत आहे. त्यातही जागतिक सरासरीपेक्षा जास्त असलेल्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या ही विशेष चिंतेची बाब आहे. या अभ्यासानुसार, 2020 मध्ये दरवर्षी होणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या जवळजवळ 1.4 दशलक्ष होती. ती 2025 पर्यंत 1.57 दशलक्ष होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कारणं काय?

बदललेली जीवनशैली, पर्यावरणीय आणि सामाजिक-आर्थिक आव्हानं या सर्वांमुळे भारतात कॅन्सर रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं म्हटलं जातंय. यामागे इतरही बरीच कारणं आहेत. धुम्रपान आणि इतर माध्यमातून (पान मसाला, मशेरी इत्यादी..) तंबाखूच्या वाढत्या वापरामुळे फुफ्फुस, तोंड आणि घशाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरित्या वाढतो, असं हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल्सचे क्लिनिकल डायरेक्टर-सर्जिकल ऑन्कोलॉजी, वरिष्ठ सल्लागार सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जिकल ऑन्कोलॉजी डॉ. चिन्नाबाबू सुनकवल्ली यांनी म्हटलंय. शिवाय वाहनं आणि उद्योगांमधून होणाऱ्या वायू प्रदूषणामुळेही विविध कर्करोगांचा धोका वाढतो. आरोग्याच्या दृष्टीने चुकीच्या ठरणाऱ्या खाण्यापिण्याच्या सवयी, प्रक्रिया केलेल्या अन्नाकडे (प्रोसेस्ड फूड) वाढणारा कल आणि एकंदरीत शारीरिक हालचाली कमी असल्याने लठ्ठपणात झालेली वाढ या सर्व गोष्टींमुळे स्तन, कोलोरेक्टल आणि एंटोमेट्रियल कॅन्सरचा धोका असतो.

हे सुद्धा वाचा

महिलांमध्ये ब्रेस्ट, सर्विक्स आणि ओव्हेरियन हे कॅन्सरचे सामान्य प्रकार आहेत. तर पुरुषांमध्ये फुफ्फुस, तोंड आणि प्रोस्टेट कॅन्सर हे सर्वसामान्य प्रकार आहेत. कॅन्सरच्या रुग्णांची संख्या आणि त्यामुळे होणारे मृत्यू दिवसेंदिवस वाढत असून पुढील दोन दशकांत ते आणखी वाढण्याची शक्यता आहे, असं पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष के. श्रीनाथ रेड्डी यांनी सांगितलंय. भारतात दरवर्षी कर्करोगाचे सुमारे दहा लाख नवीन रुग्ण आढळतात. त्यापैकी सुमारे 4 टक्के लहान मुलं असतात.

कॅन्सरच्या लक्षणांबद्दल असलेली मर्यादित जागरुकता आणि तपासणी कार्यक्रमांचा अभाव यामुळे कॅन्सरचं निदान लवकर होण्यात समस्या निर्माण होते. यामुळे बहुतेक रुग्णांमध्ये कॅन्सर नंतरच्या टप्प्यात निदान होतो. परिणामी यशस्वी उपचारांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते. देशात असे अनेक केसेस आहेत, ज्यामध्ये निदान योग्य वेळी झाल्याने कॅन्सरवरील उपचार यशस्वी ठरले. केवळ सर्वसामान्यच नव्हे तर कलाविश्वात काम करणाऱ्या अनेक सेलिब्रिटींनी कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर यशस्वीरित्या मात केली आहे. कॅन्सरशी यशस्वी झुंज दिलेले हे सेलिब्रिटी सर्वसामान्यांसाठी प्रेरणा ठरतायत. संजय दत्त, मनिषा कोइराला, राकेश रोशन, सोनाली बेंद्रे, किरण खेर, ताहिरा कश्यप, शरद पोंक्षे, लीजा रे, महिमा चौधरी, अनुराग बासू यांसारख्या सेलिब्रिटींनी कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली. तर अभिनेत्री हिना खानवर सध्या कॅन्सरचे उपचार सुरू आहेत.

कॅन्सरवर मात करणारे सेलिब्रिटी

सोनाली बेंद्रे- 2018 मध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला चौथ्या स्टेजचं मेटास्टॅटिक कॅन्सरचं निदान झालं होतं. या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सुरुवातीला सोनालीसुद्धा खचली होती. एका मुलाखतीत याविषयी सोनाली म्हणाली, “जेव्हा मला समजलं की मला कॅन्सर झालाय, तेव्हा पहिला विचार माझ्या डोक्यात आला, तो म्हणजे ‘मीच का?” मात्र पती आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याने तिने परदेशात उपचार पूर्ण केले. न्यूयॉर्कमध्ये तिच्यावर कॅन्सरचे उपचार पार पडले. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या प्रवासाबद्दलची माहिती देत चाहत्यांना प्रेरणा देत होती.

मनिषा कोइराला- अभिनेत्री मनिषा कोइरालाला 2012 मध्ये ओव्हेरियन (गर्भाशय) कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर अमेरिकेत तिच्यावर उपचार पार पडले आणि बऱ्याच संघर्षानंतर तिने कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली. बरी झाल्यानंतर मनिषाने तिच्या प्रवासाविषयी एक पुस्तक लिहिलं. कर्करोगाचा सामना करणाऱ्यांना प्रेरणा मिळावी, या हेतूने तिने हे पुस्तक प्रकाशित केलं. आजसुद्धा मनिषा कॅन्सरविषयी जागरुकता पसरवताना दिसते. लवकन निदान आणि जीवनशैलीतील महत्त्वपूर्ण बदल यांवर ती भर देते.

राकेश रोशन- प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांना 2019 मध्ये घशातील स्क्वॅमस सेल कार्सिनोमाचं निदान झालं होतं. सर्जरीच्या दिवशी हृतिकने वडिलांसोबतचा जिममधील फोटो पोस्ट करून त्याबद्दलची माहिती दिली होती. त्यात त्याने लिहिलं होतं, ‘आज सकाळी माझ्या वडिलांना मी फोटो काढण्यासाठी विचारलं. मला माहित होतं की ते सर्जरीच्या दिवशीही जिम चुकवणार नाहीत. ते माझ्या ओळखीतल्या लोकांपैकी सर्वांत बलवान आहेत. काही आठवड्यांपूर्वी त्यांना घशातील स्क्वॅमस सेल कार्सिनोमाचं निदान झालं होतं. परंतु आज ते त्याच्याशी लढा देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. त्यांच्यासारखा कुटुंबप्रमुख भेटणं हे आमचं भाग्य आहे.’

संजय दत्त- ऑगस्ट 2020 मध्ये अभिनेता संजय दत्तला चौथ्या स्टेजचं फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. याविषयी त्याने खुद्द सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती. कर्करोगावर यशस्वी मात केल्यानंतरही त्याने चाहत्यांसोबत आनंद शेअर केला होता. ‘गेले काही आठवडे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी खूप कठीण होते. पण म्हणतात ना, सर्वांत शक्तीशाली लोकांनाच देव कठीणातले कठीण संघर्ष देतो. आज माझ्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त मला हे सांगताना अत्यंत आनंद होतोय की मी कर्करोगावर यशस्वी मात केली. माझं स्वास्थ्य हीच त्यांच्यासाठी सर्वोत्तम भेट आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच मी ही लढाई जिंकू शकलो’, अशा शब्दांत त्याने आनंद व्यक्त केला होता.

View this post on Instagram

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

ताहिरा कश्यप- दिग्दर्शिका, लेखिका आणि अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपला 2018 मध्ये डक्टल कार्सिनोमा इन सिटूचं (DCIS) निदान झालं होतं. ही ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीची स्टेज होती. ब्रेस्ट कॅन्सरबद्दल आजही मोकळेपणे बोललं जात नाही. त्यामुळे महिलांमध्ये त्याबद्दलची जागरुकता कमी आहे. ताहिराने मात्र अत्यंत धाडसी पोस्ट लिहित त्याबद्दल अनेकांना प्रेरणा दिली होती. उपचारादरम्यानचे काही फोटोसुद्धा तिने पोस्ट केले होते. वयाच्या 35 वर्षी तिने कर्करोगावर यशस्वी मात केली.

महिमा चौधरी- अभिनेते अनुपम खेर यांनी 2022 मध्ये सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री महिमा चौधरीच्या कॅन्सरबद्दलची माहिती दिली होती. त्यापूर्वी माध्यमांमध्ये उघड न करता तिने उपचार घेण्यास सुरुवात केली होती. महिमाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केल्यानंतर महिमा ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात झळकली.

किरण खेर- ज्येष्ठ अभिनेत्री आणि राजकीय नेत्या किरण खेर यांना 2021 मध्ये मल्टिपल मायलोमाचं (ब्लड कॅन्सरचा एक प्रकार) निदान झालं होतं. किरण खेर यांचे पती अनुपम खेर यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे याबद्दलची माहिती दिली होती. उपचार सुरू असतानाही किरण खेर या काम करत राहिल्या. “किरण यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्यांना मल्टिपल मायलोमा झाल्याचं निदान झालं. हा ब्लड कॅन्सर त्यांच्या डाव्या हातापासून उजव्या खांद्यापर्यंत पसरला आहे”, अशी माहिती त्यावेळी चंदीगडचे भाजप अध्यक्ष अरुण सूद यांनी दिली होती.

अनुराग बासू- प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बासू यांना 2004 मध्ये प्रोमायलोसिटिक ल्युकेमियाचं (ब्लड कॅन्सरचा दुर्मिळ प्रकार) निदान झालं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांचं जीवनमान फक्त पुढचे दोन महिनेच असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र अनुराग बासू यांच्या इच्छाशक्तीने कमाल केली. कॅन्सरवर मात केल्यानंतर त्यांनी ‘बर्फी’सारख्या अप्रतिम चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.

हिना खान- प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानने जून 2024 मध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली. तेव्हापासून ती सोशल मीडियावरील विविध पोस्टद्वारे तिचा प्रवास चाहत्यांसोबत शेअर करतेय. प्रसंगी ती भावनिक झाल्याचंही पहायला मिळालं. मात्र अत्यंत धाडसाने ती सर्व उपचारांना सामोरी जात असल्याने चाहते तिचं कौतुक करत आहेत आणि ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

या सर्व सेलिब्रिटींनी केवळ कॅन्सरशी झुंजच दिली नाही तर त्याचं लवकर निदानाचं महत्त्व, उपचार आणि भावनिक ताकद यांविषयी जागरुकतादेखील पसरवण्याचा प्रयत्न केला. योग्य उपचार, सकारात्मकता आणि पाठिंब्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारावरही यशस्वी मात केली जाऊ शकते, हे त्यांच्याकडून शिकायला मिळतं.

जीवनशैलीत बदल आवश्यक

कॅन्सर.. हा शब्द ऐकला तरी धडकी भरते. आपल्या नियंत्रणाबाहेर आणि ज्याच्याशी आपण लढू शकत नाही अशा गोष्टींपैकी ही एक असल्यासारखं वाटतं. मात्र रोजच्या जीवनात काही महत्त्वपूर्ण बदल केल्यास अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणात राहू शकतात, असं तज्ज्ञ सांगतात. खाण्यापिण्याच्या योग्य सवयी, शारीरिक हालचाल, स्वत:च्या आरोग्यासाठी काढलेला वेळ, जंक किंवा प्रोसेस्ड फूड खाणं टाळणं यांमुळे आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल होऊ शकतात. दररोजच्या जीवनातील या छोट्या-छोट्या सवयी कदाचित कॅन्सरपासून पूर्णपणे बचाव करू शकणार नाही, पण रिकव्हरीदरम्यान ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

“संशोधनातून असं दिसून आलंय की आहार आणि जीवनशैलीतील बदल यांमुळे 30 ते 40 टक्के कर्करोग रोखता येऊ शकतो. कर्करोगाचा धोका आणि त्यापासून रिकव्हरी यांमध्ये आहार महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो”, असं डीडीएच रेनोवा कॅन्सर सेंटरमधील वरिष्ठ सल्लागार वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विशाल टोका म्हणाले. “भाज्या, फळं, धान्य, प्रथिने यांचं पुरेशा प्रमाणात सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती सुधारू शकते”, असंही त्यांनी सांगितलं.

“नियमित शारीरिक हालचालींमुळे अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका 20 ते 30 टक्क्यांनी कमी होतो, उपचारांचे परिणाम सुधारतात आणि एकंदरीत जीवनमान सुधारतं. जे आधीच या आजाराचा सामना करत आहेत, त्यांच्यासाठीही व्यायाम आणखी फायदेशीर आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते”, असंही डॉ. टोका यांनी नमूद केलंय.

आपल्या जीवनशैलीत हे सकारात्मक बदल केल्यास त्याचे अनेक फायदे आपल्याला दैनंदिन जीवनात होतात. हे फायदे रोग किंवा आजारापासून बचाव आणि रिकव्हरी यांपुरतेच मर्यादित नाहीत. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं, आपली ऊर्जा टिकून राहते. हे फक्त कॅन्सरबद्दलच नाही तर या चांगल्या सवयी एकूणच आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारतात.

(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)

शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय
शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय.
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल.
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक.
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?.
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'.
अखेर दादांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या उमेदवाराचं नावं जाहीर
अखेर दादांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या उमेदवाराचं नावं जाहीर.
भाजपची राज्य करण्याची पद्धत कपटी आणि कारस्थानी; संजय राऊत बरसले
भाजपची राज्य करण्याची पद्धत कपटी आणि कारस्थानी; संजय राऊत बरसले.
एका मंत्र्याची विकेट जाणार, जो बायकोच्या आड लपतो, सुळेंचा गौप्यस्फोट
एका मंत्र्याची विकेट जाणार, जो बायकोच्या आड लपतो, सुळेंचा गौप्यस्फोट.
पुढचे 4 दिवस जरा जपून..उन्हाचा पारा वाढला, तुमच्या भागात किती तापमान?
पुढचे 4 दिवस जरा जपून..उन्हाचा पारा वाढला, तुमच्या भागात किती तापमान?.
मुजोर रिक्षा चालकाचा माज व्हायरल; हात जोडून विनवण्या तरीही केली मारहाण
मुजोर रिक्षा चालकाचा माज व्हायरल; हात जोडून विनवण्या तरीही केली मारहाण.