Bigg Boss 19 : तेव्हा वाटलं जीव द्यावा, वडील मारायचे अन्..; ढसाढसा रडली तान्या मित्तल
Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरातील एका टास्कदरम्यान जेव्हा कुनिका सदानंदने तान्याला तिच्या आईवरून खोचक टोला लगावला, तेव्हा तिला अश्रू अनावर झाले आणि भूतकाळातील त्रासदायक घटना आठवल्या. तान्याने तिच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले.

‘बिग बॉस’चा एकोणिसावा सिझन टेलिव्हिजनवर सुरू आहे आणि अगदी पहिल्या एपिसोडपासूनच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि उद्योजिका तान्या मित्तल सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. बिग बॉसच्या (Bigg Boss 19) घरात नुकत्याच पार पडलेल्या एका टास्कदरम्यान सहस्पर्धकाने केलेल्या टिप्पणीमुळे तान्याला अश्रू अनावर होतात. या घटनेमुळे तिला तिच्या भूतकाळातील दु:खद आठवणी जाग्या होतात. या टास्कमध्ये तान्या गौरव खन्नासोबत सहभागी झाली होते. घरातील सदस्यांना 19 मिनिटांनंतर बझर दाबण्यापासून विचलित करण्यास सांगितलं गेलं होतं. तेव्हा टास्कदरम्यान कुनिका सदानंद तान्याच्या आईचा उल्लेख करून मर्यादा ओलांडते.
“तान्याच्या आईने तिला काहीच शिकवलं नाही”, अशी खोचक टिप्पणी कुनिका करते. ही गोष्ट तान्याच्या मनावर आघात करते. तरीसुद्धा ती टास्क पूर्ण करते, परंतु त्यानंतर ती तिचे अश्रू रोखू शकत नाही. यावेळी तान्या तिच्या लहानपणीच्या त्रासदायक आठवणी सांगते. “माझे वडील मला मारायचे आणि माझी आई मला वाचवायची. अनेक अडथळ्यांनंतर आणि संकटांनंतर मी माझा बिझनेस सुरू केला. मला साडी नेसायला किंवा घराबाहेर पडायलाही परवानगी घ्यावी लागत होती. मी 19 वर्षांची असताना त्यांनी माझं लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मला अक्षरश: जीव द्यावंसं वाटलं,” अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.
View this post on Instagram
आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची हिंमत आणि ताकद आईकडून मिळाल्याचं तिने सांगितलं. सर्वांत कठीण काळात आई माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि मला सक्षम केलं, असं ती पुढे म्हणाली. तान्याची ही कहाणी ऐकून घरातील सर्व सदस्यांना मोठा धक्का बसला. नंतर गौरव, अमाल मलिक, झीशान कादरी आणि प्रणित मोरे यांनी कुनिकाला तिच्या असंवेदनशील टिप्पणीबद्दल सुनावलं.
तान्या मित्तल ही उद्योजिका आणि इन्फ्लुएन्सर आहे. ‘हँडमेड विथ लव्ह बाय तान्या’ या लाइफस्टाइल लेबलची ती संस्थापिका आहे. या लेबलअंतर्गत हँडबॅग्स, हँडकफ्स आणि साड्या यांसारखे प्रॉडक्ट्स बनवले जातात. तान्याचे इन्स्टाग्रामवर 29 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला मौनी अमावस्येला महाकुंभमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर तान्या सोशल मीडियावर चर्चेत आली होती.
