Aai Kuthe Kay Karte: ‘तुझ्यासारख्या बाईला रोज शेजारी झोपायला कुणी तरी लागतं’, अनिरुद्ध देशमुखच्या बोलण्यानं अरुंधती जोगळेकरला भोवळ

| Updated on: Mar 21, 2022 | 11:48 AM

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा महाएपिसोड नुकताच पार पडला. होळीची धमाल या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळाली. अरुंधती (Arundhati) आणि आशुतोष यांची वाढत असलेली जवळीक अनिरुद्धच्या (Aniruddha) डोळ्यात खुपतेय. त्या दोघांबद्दलचे विचार त्याला स्वस्थ झोपूही देत नाहीत.

Aai Kuthe Kay Karte: तुझ्यासारख्या बाईला रोज शेजारी झोपायला कुणी तरी लागतं, अनिरुद्ध देशमुखच्या बोलण्यानं अरुंधती जोगळेकरला भोवळ
Aai Kuthe Kay Karte Updates
Image Credit source: Hotstar
Follow us on

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा महाएपिसोड नुकताच पार पडला. होळीची धमाल या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळाली. अरुंधती (Arundhati) आणि आशुतोष यांची वाढत असलेली जवळीक अनिरुद्धच्या (Aniruddha) डोळ्यात खुपतेय. त्या दोघांबद्दलचे विचार त्याला स्वस्थ झोपूही देत नाहीत. त्यात संजना आगीत तेल ओतायचं काम  करते. अरुंधती आणि आशुतोष एकत्र राहत असतील, असा संशय ती अनिरुद्धसमोर व्यक्त करते. याच संशयामुळे अनिरुद्ध अखेर अरुंधतीच्या घरात येऊन पोहोचतो. रात्री लपूनछपून तो तिच्या घरात येतो आणि त्यानंतर काय होतं, ते प्रेक्षकांना आजच्या (21 मार्च) भागात पहायला मिळणार आहे. घरात कोणीतरी शिरलंय, या भीतीने अरुंधती यशला फोन करते. यशसमोर अनिरुद्धचं पितळ उघड पडतं. मात्र तरीही आपली चूक मान्य न करता अनिरुद्ध तिलाच सुनावतो.

“संशयाने इतकं वेडंपिसं करून सोडलंय यांना, की उरलीसुरली लाजसुद्धा सोडून दिली. डोक्यातले घाणेरडे विचार गप्प बसू देईना, मग आले इथे मध्यरात्री चोरासारखे. मी आणि आशुतोष एकत्र राहतोय की नाही, हे पहायला आलात ना,” असा सवाल अरुंधती करते. त्यावर अनिरुद्ध म्हणतो, “हो, मला बघायचं होतं, कारण तुमच्या बोलण्यावर आता मला विश्वास नाही. तुम्हाला रंगेहाथ पकडायला आलो. तुमचा हा खोटारडेपणा मला आता असह्य होतोय. त्यापेक्षा सांगून टाका ना, तुम्ही एकत्र राहता म्हणून. आज वाचलात तुम्ही, पण एरव्ही राहतच असाल ना. तू जगाला फसवू शकशील, मला नाही. तुझ्यासारखी बाई एकटी नाही राहू शकत. तुझ्यासारख्या बाईला आधाराची गरज असते. रात्री झोपताना कोणीतरी लागतं शेजारी.”

अनिरुद्धच्या तोंडून असे शब्द ऐकून यश आणि अरुंधतीचा राग अनावर होतो. “तुम्हाला काय वाटलं, मी तुम्हाला आणि संजनाला ज्या अवस्थेत पाहिलं, तशी मी तुम्हाला दिसेन? आणि मग काय कराल, जगासमोर उघडं पाडाल मला? विकृत होत चाललात तुम्ही. किळस येते मला तुमची,” अशा शब्दांत अरुंधती व्यक्त होते. संजनाला फोन करून सगळं सांगण्याचा ती विचार करते. मात्र संजनाला यात अडकवायची गरज नाही. ही गोष्ट इकडनं बाहेर जाता कामा नये, असं सांगून अनिरुद्ध तिला थांबवतो. पुन्हा असं काही केल्यास पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचा इशारा अरुंधती अनिरुद्धला देते. “खरंतर तुम्हाला पोलिसांच्याच ताब्यात द्यायला हवं. पण तुम्ही जेलमध्ये गेलात तर घराची घडी पुन्हा विस्कटेल, म्हणून सोडून देतेय लक्षात ठेवा,” असं ती म्हणते. एवढं होऊनही अनिरुद्धचा अहंकार आणि संशयी वृत्ती जात नाही. “तुझं नशिब चांगलं होतं म्हणून आशुतोष इथे नव्हता. पण एक दिवस मी तुम्हाला नक्की पकडेन,” असं म्हणून तो तिथून निघून जातो.

अरुंधतीने अनेक वर्षं अनिरुद्धच्या धाकात घालवली आणि आता त्यांच्या भीतीत घालवायची का, असा प्रश्न तिला पडला आहे. याच विचारांनी तिला भोवळ येते. अनिरुद्धचा हा कारनामा संजनाला कळेल की नाही, देशमुख कुटुंबीयांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल की नाही, हे मालिकेच्या आगामी भागांतून स्पष्ट होईल.

हेही वाचा:

लेखक नशा करून, गांजा मारून लिहितात का? ट्रोलिंगवर ‘आई कुठे काय करते’च्या लेखिकेचा परखड सवाल

Sher Shivraj Teaser: ‘पावनखिंड’नंतर आता ‘शेर शिवराज’; अफजलखानाच्या वधाचा इतिहास मोठ्या पडद्यावर