KBC 16 : अखेर अमिताभ बच्चन यांच्या ओठावर ती गोष्ट आलीच; बिग बी म्हणाले, ती इच्छा अपुरीच राहिली…
प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही बनायचं असतं. पण आयुष्य एका टर्निंग पॉइंटवर माणसाला दुसऱ्याच गोष्टीकडे घेऊन जातं. त्यामुळे माणसाची इच्छा अर्धवट राहते. काहींच्या इच्छा पूर्ण होतात. तर काहींच्या इच्छा अधुऱ्याच राहतात. आपल्या एका अर्धवट राहिलेल्या इच्छेबद्दल अमिताभ बच्चन यांनी भरभरून सांगितलं. काय होती अमिताभ यांची ती इच्छा?
‘कौन बनेगा करोड़पति 16’लाही अत्यंत उदंड प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या 24 वर्षापासून महानायक अमिताभ बच्चन हा शो करत आहेत. एवढ्या वर्षात अजूनही या शोची क्रेझ काही कमी झालेली नाही. आजही घराघरात हा शो पाहिला जातो. या शोमध्ये अमिताभ बच्चन हे स्पर्धकाला प्रश्न करत असतात. या प्रश्नाची उत्तरे स्पर्धकांकडून दिली जातात. यावेळी स्पर्ध त्याच्या आयुष्यातील असंख्य गोष्टी उजागर करत असतो. तर अमिताभ बच्चनही या गप्पांच्या ओघात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग, निर्णय सांगत असतात. अमिताभ बच्चन यांची क्रेझ प्रचंड आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पर्सनल गोष्टी ऐकण्यासाठी चाहते आतुर असतात. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अमिताभ यांनी त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट शेअर केली. त्यांच्या जीवनातील कोणती इच्छा अर्धवट राहिली याचा खुलासाच त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील एक महिला स्नेहा यांनी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंड जिंकला आणि त्या हॉटस्पॉटवर बसल्या. अमिताभ यांनी नेहा यांचं स्वागत केलं. यावेळी नेहा यांनी मास्टर्सची डिग्री पूर्ण केल्याचं आणि लष्करात भरती होण्याचं आपलं स्वप्न बोलून दाखवलं. देश सेवा करण्यासाठी आपण लष्करात जाणार असल्याचं तिने सांगितलं. तिचं हे ध्येय पाहून अमिताभ यांनी तिचं कौतुक केलं. तिला प्रोत्साहित केलं आणि बोलता बोलता त्यांनीही त्यांच्या मनातील एक अर्धवट राहिलेली इच्छा बोलून दाखवली.
तेव्हा आमच्यात बदल होतो
देशातील प्रत्येक नागरिकाने लष्करात गेलं पाहिजे, असं नेहा म्हणाल्या. तिचा हा विचार ऐकून अमिताभ प्रचंड प्रभावित झाले. आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. मला सैनिकार्च्या गणवेशाचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे. तरुणपणात तर सर्वात अधिक आकर्षण होतं. एखादी व्यक्तीरेखा साकार करण्याच्या बहाण्याने का असेना जेव्हा आम्ही जवानाचा गणवेश घालतो तेव्हा आमच्यात बदल झालेला आम्हाला जाणवतो. आम्ही त्यावेळी जबाबदारीने काम करू लागतो. स्वयंशिस्तीकडे अधिक लक्ष देतो, असं अमिताभ म्हणाले.
View this post on Instagram
तर लष्करात सामील होईल
संयम म्हणजे नेमकं काय असतं हे लष्करात गेल्यावरच कळतं. प्रत्येकाने लष्करात गेलं पाहिजे हे तुम्ही खरोखर चांगलं सांगितलं. मलाही सैन्यात सामील व्हायचं होतं. मला लष्कराचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे. पण भविष्यात मला जर ही संधी मिळाली तर मी माझ्या मर्जीने आणि स्वखुशीने लष्करात सामील होईल, असंही अमिताभ यांनी स्पष्ट केलं.