
साऊथ सुपरस्टार थलपती विजयचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात आणि ते काहीही करायला तयार असतात. याआधी थलपती विजयच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. अशातच त्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये एअरपोर्टवर त्यांची तुंबड गर्दी केल्याचं पहायला मिळतंय. थलपती विजय सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान असं काही घडलं, ज्यामुळे नेटकरीसुद्धा अस्वस्थ झाले. विजयचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांनाही अस्वस्थ करणारा आहे. तो एअरपोर्टवर पोहोचताच चाहत्यांनी इतकी गर्दी केली आणि गोंधळ घातला की अखेर कारमध्ये बसण्याआधी तोल ढासळून तो धडपडला. सुरक्षारक्षकांनी विजयला उचलून गाडीत बसवलं.
थलपती विजय त्याच्या शेवटच्या ‘जन नायकन’ (Jana Nayagan) या चित्रपटाच्या ऑडिओ लाँचसाठी मलेशियाला गेला होता. मलेशियामधील कार्यक्रमादरम्यान त्याने या वृत्ताला दुजोरा दिला की, या चित्रपटानंतर तो पुन्हा अभिनयक्षेत्रात काम करणार नाही. त्यानंतर 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी थलपती विजय मलेशियाहून चेन्नईला परतला. चेन्नई एअरपोर्टवर आधीपासूनच चाहत्यांनी गर्दी केली होती. जेव्हा त्यांनी विजयला पाहिलं, तेव्हा गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर या घटनेचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
VIDEO | TVK chief Vijay stumbled and fell while trying to get into his car at the Chennai airport.
A large crowd of fans gathered to welcome him as he returned from Malaysia.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/x42Kpd0AsW
— Press Trust of India (@PTI_News) December 28, 2025
एअरपोर्टवरील गर्दीतून सुरक्षारक्षक कसेबसे त्याला बाहेर घेऊन येतात. यावेळी त्याच्या आजूबाजूला चाहत्यांची अस्वस्थ करणारी गर्दी पहायला मिळते. त्यातून मार्ग काढत त्याला गाडीजवळ आणलं जातं, तेव्हाच त्याला तोल जातो आणि तो खाली कोसळतो. त्याच्या दुसऱ्याच क्षणाला सुरक्षारक्षक त्याला उचलून गाडीत बसवतात. एखादा आरोप आपले प्राण वाचवून जस पळ काढतो, त्या पद्धतीने विजयला एअरपोर्टवरून रेस्क्यू करण्यात आलं होतं. यादरम्यान एअरपोर्ट परिसरातील विजयच्या एका गाडीचंही नुकसान झालं. चाहत्यांच्या अशा वागण्याबद्दल सोशल मीडियावर नेटकरी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
थलपती विजयने राजकारणात प्रवेश केला आहे. समाजकार्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यासाठी अभिनयक्षेत्र सोडणार असल्याचं त्याने जाहीर केलं होतं. त्यामुळे ‘जन नायकन’ हा त्याचा शेवटचा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत बॉबी देओल आणि पूजा हेगडे यांच्याही भूमिका आहेत. नवीन वर्षात 9 जानेवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.