The Kerala Story मधील 10 सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री; माजी मुख्यमंत्र्यांची मुलाखतही हटवण्याचे आदेश

| Updated on: May 03, 2023 | 9:34 AM

केरळमधील मुस्लिम युथ लीगने 32 हजार मल्याळी महिलांना ISIS ने दहशतवादी बनवलं, हे सिद्ध करणाऱ्याला एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तर सेन्सॉर बोर्डाने टीझरमध्ये नमूद केलेल्या आकड्याला सिद्ध करणारी अधिकृत कागदपत्रे निर्मात्यांकडे मागितली आहेत.

The Kerala Story मधील 10 सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री; माजी मुख्यमंत्र्यांची मुलाखतही हटवण्याचे आदेश
The Kerala Story
Image Credit source: Youtube
Follow us on

मुंबई : सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा आहे. येत्या 5 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘A’ प्रमाणपत्र दिलं आहे. त्याचसोबत सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील एक दोन नव्हे तर दहा सीन्सवर कात्री चालवली आहे. यामध्ये केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचाही सीन आहे. ते मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंद असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि ISIS चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

चित्रपटातून डिलिट केले सीन्स

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटातील इतर काही सीन्स ज्यांमध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान करण्यात आला आहे, असे सीन्सही सेन्सॉर बोर्डाने हटवले आहेत. त्याच्याशी संबंधित काही डायलॉग्सवरही कात्री चालवली आहे. ‘भारतीय कम्युनिस्ट्स हे सर्वांत मोठे ढोंगी आहेत’ या डायलॉगमधील भारतीय हा शब्द हटवण्यात आल्याचं कळतंय.

या चित्रपटातून केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचे सीन्सही काढून टाकण्यात आले आहेत. या सीनमध्ये ते म्हणतात, “केरळ पुढील दोन दशकांत मुस्लिम बहुल राज्य बनेल. कारण इथल्या तरुणांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रभावित केलं जातंय.” सेन्सॉर बोर्डाने ही संपूर्ण मुलाखतच चित्रपटातून हटवण्याचे आदेश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

32 हजार महिलांच्या उल्लेखावरून वाद

‘द केरळ स्टोरी’च्या टीझरमध्ये 32 हजार महिलांचा उल्लेख करण्यात आला होता. केरळमधील 32 हजार महिलांचं धर्मपरिवर्तन करून ISIS या दहशतवादी संघटनेत सामील करून घेतल्याचं म्हटलं होतं. यावरूनच आता मोठा वाद निर्माण झाला आहे. केरळ सरकार आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या चित्रपटावर राज्यात बंदी घालण्याची मागणी केली आहे. सीपीएम आणि काँग्रेसने चित्रपट प्रदर्शित न करण्याची भूमिका मांडली. तर दुसरीकडे वितरकांनी त्यांचा वेगळा मुद्दा मांडला. जरी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही तरी त्याला ओटीटीवर असंख्य प्रेक्षक पाहतील. त्यामुळे तो थिएटरमध्येच प्रदर्शित करावा, असं ते म्हणाले.

केरळमधील मुस्लिम युथ लीगकडून 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर

केरळमधील मुस्लिम युथ लीगने 32 हजार मल्याळी महिलांना ISIS ने दहशतवादी बनवलं, हे सिद्ध करणाऱ्याला एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तर सेन्सॉर बोर्डाने टीझरमध्ये नमूद केलेल्या आकड्याला सिद्ध करणारी अधिकृत कागदपत्रे निर्मात्यांकडे मागितली आहेत.