
अभिनेता सलमान खान याची एक्स – गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री संगीता बिजलानी हिचं मोठं नुकसान झालं आहे. अभिनेत्रीच्या पवना धरणाजवळ असलेल्या तिकोना पेठ गावातील फार्महाऊसमध्ये चोरी झाल्याची माहिती शुक्रवारी दुपारी समोर आली. यासंदर्भात अभिनेत्रीने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी देखील चौकशी सुरु केली आहे. एवढंच नाही तर, परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे जाणूनबुजून फोडण्यात आल्याचं उघड झालं आहे.
घटनेची माहिती मिळताच अभिनेत्री देखील फार्महाऊस पोहोचली. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला वडिलांच्या आजारपणामुळे गेल्या चार महिन्यांपासून फार्महाऊसवर येणं शक्य झालं नाही. अभिनेत्री शनिवारी सकाळी फार्महाऊसवर आली असता फार्महाऊसचा मुख्य दरवाजा तुटलेला, खिडक्यांचे गज तोडण्यात आले होते. फार्महाऊसमध्येही तोडफोड झाली होती. अनेक मौल्यवान वस्तू गायब झाल्याची माहिती समोर येत आहे.
घडलेल्या घटनेवर संगीता बिजलानी म्हणाली, ‘फार्महाऊसच्या मुख्य दरवाजा आणि खिडकीची ग्रिल तुटलेली आहे. एक टीव्ही सेट देखील गायब आहे. घरातील काही महत्त्वाच्या वस्तू देखील चोरांनी लंपास केल्या आहे. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे देखील तोडले आहेत.’ घटनेमुळे अभिनेत्रीला मोठा धक्का बसला आहे. तर पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 16 वर्षी अभिनेत्रीने करीयरला सुरुवात केली. 1980 मध्ये मिस इंडियाचं ताज स्वतःच्या नावावर केल्यानंतर संगीता हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘त्रिदेव’, ‘विष्णु देवा’, आणि ‘युगांधर’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका बजावली.
बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना, अभिनेत्री फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत होती. अभिनेता सलमान खान याच्यासोबत संगीता अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचं नातं लग्नापर्यंत देखील पोहोचलं होतं. पण लग्न होऊ शकलं नाही. अखरे सलमान आणि संगीता यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण आजाही संगीता आणि सलमान चांगली मित्र आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील केलं जातं…