सलमानच्या अभिनेत्रीची टीबीशी झुंज; आता फक्त 100 रुपयांसाठी चालवते डब्बा सर्व्हिस

| Updated on: Mar 19, 2024 | 2:42 PM

सलमान खानच्या 'वीरगती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने खऱ्या आयुष्यात बराच संघर्ष केला. या अभिनेत्रीला जेव्हा टीबीचं निदान झालं, तेव्हा तिच्या पती आणि सासरच्या मंडळींनीही साथ सोडली.

सलमानच्या अभिनेत्रीची टीबीशी झुंज; आता फक्त 100 रुपयांसाठी चालवते डब्बा सर्व्हिस
Salman Khan and Pooja Dadwal
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 19 मार्च 2024 | बॉलिवूड इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणं प्रत्येक कलाकारासाठी शक्य नसतं. काहींना हे यश सहजासहजी मिळतं तर काहींना त्यासाठी खूप मेहनत आणि प्रतीक्षा करावी लागते. इंडस्ट्रीत असेही काही कलाकार आहे, ज्यांना पहिल्याच चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली. मात्र त्यानंतर त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वीरगती’ या चित्रपटात सलमान खान आणि पूजा दडवाल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट जरी फ्लॉप झाला असला तरी त्यातून दोघांनाही चांगली लोकप्रियता मिळाली. मात्र या चित्रपटानंतर पूजाच्या आयुष्यात अनेक चढउतार आले.

2019 मध्ये पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली होती. त्यावेळी तिच्याकडे आजारपणात उपचारासाठी पैसेदेखील नव्हते. पूजाचा जन्म 5 जानेवारी 1977 रोजी मुंबईत झाला. लहानपणापासूनच तिला चित्रपटांची आणि अभिनयाची आवड होती. म्हणूनच शालेय शिक्षणासोबतच ती अभिनयाचेही धडे घेत होती. एकेदिवशी अॅक्टिंग क्लासदरम्यान पूजाला चित्रपटाची ऑफर मिळाली. वयाच्या 17 वर्षी तिने सलमान खानच्या ‘वीरगती’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नाही. यानंतर पूजा आणखी काही चित्रपटांमध्ये झळकली. मात्र तिला अपेक्षित असं यश मिळालं नाही.

चित्रपटांमध्ये यश न मिळाल्याने अखेर पूजा टेलिव्हिजन इंडस्ट्रीकडे वळली. तिने ‘आशिकी’ आणि ‘घराना’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. छोट्या पडद्यावर काम करतानाही पूजा काही चांगल्या ऑफर्सच्या प्रतीक्षेत होती. करिअरमध्ये फारसं यश मिळत नसल्याने तिने लग्न करण्याचं ठरवलं. लग्नानंतर पूजा पतीसोबत गोव्याला राहायला गेली. मात्र 2018 मध्ये ती आजारी पडली. पूजाला टीबीचं निदान झालं होतं. जेव्हा पूजाच्या पतीला आणि सासरच्या मंडळींना तिच्या आजारपणाविषयी समजलं, तेव्हा त्यांनी तिच्यासोबतचे सर्व संबंध मोडले. आजारपणातच त्यांनी पूजाला मुंबईत एकटं सोडलं.

हे सुद्धा वाचा

अखेर अभिनेते राजेंद्र सिंह यांनी पूजाची मदत केली आणि तिला सरकारी रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी पूजाने युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करत आर्थिक मदतीची विनंती केली होती. सलमान खानने त्यावेळी लगेचच पूजाची मदत केली होती. सलमानने सहा महिन्यांपर्यंत पूजाच्या उपचाराचा खर्च उचलला होता. तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर पूजा तिच्या कुटुंबीयांसोबत मुंबईतील एका छोट्या घरात राहू लागली. 2020 मध्ये तिने ‘शुकराना: गुरू नानक देवजी’ या पंजाबी चित्रपटातून कमबॅक केलं. मात्र हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. त्यामुळे पूजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडली होती.

‘न्यूज 18’ या वृत्तवाहिनीच्या एका रिपोर्टनुसार, पूजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की तिची मैत्रीण आणि दिग्दर्शक राजेंद्र सिंह यांनी तिला डब्बा सर्व्हिस सुरू करण्याचा सल्ला दिला होता. यासाठी त्यांनी आवश्यक गोष्टी आणि जागा पुरवली होती. आता पूजा तिच्या उदरनिर्वाहासाठी लोकांना जेवणाचा डब्बा पुरवते.