
अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या लग्नाला आता जवळपास 35 वर्षे झाली आहेत. वयात 18 वर्षांचं अंतर असूनही आयुष्यातील अनेक चढ-उतारांना सामोरं जात दोघांनी लग्न टिकवलं आहे. ‘मी बहुरुपी’ या अशोक सराफांच्या आत्मचरित्रात निवेदिता यांनी त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगितली आहे. गोव्यातील मंगेशीच्या देवळात लग्न व्हावं अशी अशोक सराफांच्या आईची इच्छा होती. कारण मंगेश हे सराफ कुटुंबाचे कुलदैवत. शिवाय अशोक सराफ यांचीही कुलदैवतांवर खूप श्रद्धा आहे. म्हणूनच 27 जून 1989 रोजी गोव्यात कुलदैवतांच्या देवळात दोघांचं लग्न झालं. खरंतर लग्नासाठी आधी निवेदिता यांनी अशोक सराफांना विचारलं होतं. त्यावेळी त्यांनी थेट नकार दिला होता.
निवेदिता यांचा स्वभाव मुळातच टिपिकल रोमँटिक नसल्याने त्यांना जेव्हा जाणवलं की अशोक सराफ आपल्याला आवडत आहेत, तेव्हा त्यांचं त्यांनाच खूप नवल वाटलं होतं. दुसरीकडे अशोक यांच्या मनात काय होतं, हेसुद्धा निवेदता यांना त्यावेळी कळत नव्हतं. परंतु निवेदिता यांच्या मनाची ही घालमेल लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लक्षात आली होती. कारण लक्ष्मीकांत बेर्डे आणि निवेदिता सराफ हे दोघंही लहानपणापासून एकमेकांना ओळखायचे. “अशोकला भेटायला कुणी मुलगी आली की तू तिच्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेनं बघतेस”, असं लक्ष्यानं निवेदिता यांना म्हटलं होतं.
अखेर एकेदिवशी निवेदिता यांनी अशोक यांना सरळ सांगून टाकलं, “मला तुझ्याशी लग्न करायचंय.” तेव्हा अशोक सराफांनी थेट नकार दिला होता. या नकारामागे त्यांची वेगळी कारणं होती. “माझा नुकताच अपघात झाला आहे. उद्या काही कॉम्प्लिकेशन झाली तर तुला त्रास सहन करावा लागेल. तू माझ्यापेक्षा वयानं खूप लहान आहेस. तुला अधिक तरुण आणि चांगला मुलगा मिळू शकतो”, असं ते निवेदिता यांना म्हणाले. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, किरण शांताराम यांनी अशोक यांचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते.
एप्रिल 1987 मध्ये अशोक सराफ यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातातून ते चमत्कारिकरित्या बचावले होते. त्याच्या दोन वर्षांनंतर त्यांनी निवेदिता यांच्याशी लग्न केलं. सचिन पिळगांवकर, मच्छिंद्र कांबळी, गिरीश घाणेकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रुही, अजय सरपोतदार हे सर्वजण या लग्नाला उपस्थित होते. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे आईवडील गोव्याचेच असल्याने तेसुद्धा लग्नाला उपस्थित होते. परंतु अशोक सराफ यांचे वडील आजारी असल्यामुळे या लग्नाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे अशोक सराफ यांचा मावसभाऊ जयमराम खवटे यांनी लग्न लावून दिलं होतं. लग्नाचे सर्व विधी त्यांच्या हस्ते पार पडले. तर निवेदिता यांचं कन्यादान करण्यासाठी त्यांचे मामी-मामी आले होते.