त्रिशा कृष्णनला झटका, थलपती विजय यांच्या परवानगीनंतरही हाती निराशाच; दिग्दर्शक भावूक

तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी विशेष परवानगी दिल्यानंतरही अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या हाती निराशाच आली आहे. 'करुप्पू' या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी अखेर सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे.

त्रिशा कृष्णनला झटका, थलपती विजय यांच्या परवानगीनंतरही हाती निराशाच; दिग्दर्शक भावूक
Trisha Krishnan and Thalapathy Vijay
Image Credit source: Instagram
| Updated on: May 14, 2026 | 12:31 PM

तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी विशेष परवानगी दिल्यानंतरही अभिनेत्री त्रिशा कृष्णनला मोठा झटका मिळाला आहे. तिच्या आगामी ‘करुप्पू’ या चित्रपटाचे सकाळी 9 वाजताचे शोज रद्द करण्यात आले आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली आहे. त्यामुळे त्रिशा आणि सूर्याचे चाहते नाराज झाले आहेत. कारण तब्बल 21 वर्षांनंतर ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहे. तमिळनाडूमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून चित्रपटाचे सकाळचे शोज बंद करण्यात आले होते. परंतु विजय यांनी मुख्यमंत्री बनताच सकाळच्या शोजना परवानगी दिली आणि त्याचा थेट फायदा त्रिशाच्या या चित्रपटाला होणार होता. मात्र तरीही ‘करुप्पू’चे सकाळचे शोज रद्द करण्यात आले आहेत.

परवानगीनंतरही शोज रद्द

‘काही टाळता न येणाऱ्या कारणांमुळे ‘करुप्पू’चे सकाळी 9 वाजताचे शोज रद्द केले आहेत. यासाठी आम्ही सर्वांची मनापासून माफी मागतो’, अशी पोस्ट चित्रपटाचे निर्माते एस. आर. प्रभू यांनी लिहिली आहे. परंतु हे शोज का रद्द झाले, यामागचं नेमकं कारण समोर आलं नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘प्रिय चाहते, सध्याच्या परिस्थितीबद्दल माझ्याकडे निश्चित कोणतंच उत्तर नाही. अडचणी दूर करण्यासाठी निर्माते खूप प्रयत्न करत आहेत. या चित्रपटाच्या वाटेत कायम अडथळे आले आणि देवाने आम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गही दाखवला आहे. 32 महिन्यांनंतर आपण इथे पोहोचलो आहोत. यावेळीही मला देवावर पूर्ण विश्वास आहे’, असं त्यांनी लिहिलं आहे.

दिग्दर्शकांची पोस्ट-

तमिळनाडूमध्ये सकाळचे शोज का नाहीत?

देशातल्या इतर राज्यांमध्ये सकाळी 9 वाजताचे शो सर्वसामान्य असले तरी तमिळनाडूतील थिएटर मालक मात्र सकाळचे शोज लावणं टाळतात. यामागचं कारण म्हणजे तिथल्या सुपरस्टार्सची असलेली प्रचंड फॅन फॉलोईंग. कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंतेपोटी हा निर्णय घेण्यात आला होता. 2023 मध्ये पोंगलच्या वेळी घडलेल्या एका दु:खद घटनेनंतर तमिळनाडू राज्य प्रशासनाने पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या शोजवर कारवाई करण्यास सुरुवात केली. अजितचा ‘थुनाइवू’ आणि विजयचा ‘वारिसू’ या दोन मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या वेळी चाहत्यांनी प्रचंड गोंधळ घातला होता. या गोंधळामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर तमिळनाडूच्या डीएमके सरकारने सकाळच्या शोजवर बंदी घातली होती.

Follow Us