उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते..; प्रसाद ओकने सांगितला तो खास प्रसंग
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता प्रसाद ओक 'धर्मवीर' या चित्रपटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. या चित्रपटात त्याने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. उद्धव ठाकरे रस्त्यावर माझी वाट बघत उभे होते, असा किस्साही त्याने सांगितला.

‘धर्मवीर: मुक्काम पोष्ट ठाणे’ हा अभिनेता प्रसाद ओकच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट ठरला. यामध्ये त्याने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली. या चित्रपटानिमित्त त्याने काही राजकीय व्यक्तिमत्त्वांसोबत भेटीगाठी केल्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसाद ओक या चित्रपटाविषयी आणि राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. “उद्धव ठाकरे हे माझ्या खूप जवळचे आहेत आणि एकनाथ शिंदेही माझ्या खूप जवळचे आहेत”, असं त्याने स्पष्टपणे या मुलाखतीत सांगितलं. यावेळी त्याने उद्धव ठाकरेंचा एक प्रसंगसुद्धा सांगितला.
‘एबीपी माझा’ला दिलेल्या एका मुलाखतीत प्रसादला विचारण्यात आलं होतं की, या भूमिकेमुळे राजकीयदृष्ट्या काही त्रास झाला का? त्यावर प्रसादने सांगितलं, “मी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या खूप जवळचा व्यक्ती आहे. मला कुणीच प्रश्न विचारला नाही की तू ही भूमिका का करतोय? मला अजिबातच भीती वाटली नाही. भीती वाटली असती तर मी कलाकार झालोच नसतो. प्रत्येक कलाकार चांगल्या भूमिकेची, संधीची वाट पाहत असतो. मी जवळपास 95 चित्रपट केले, तरीसुद्धा मी अशा संधीची वाट पाहत होतो. धर्मवीर हा माझ्या करिअरमधला 96 वा चित्रपट आहे आणि त्यात मी सर्वस्व झोकून दिलं.”
यावेळी उद्धव ठाकरेंचा प्रसंग सांगत प्रसाद पुढे म्हणाला, “चित्रपट पाहिल्यानंतर संजय राऊत यांनी माझं खूप कौतुक केलं. धर्मवीर पाहिल्यानंतर तर जोपर्यंत प्रसाद ओक येत नाही, तोपर्यंत मी मीडियाला प्रतिक्रिया देणार नाही, असं सांगून उद्धव ठाकरे रस्त्यावरच उभे राहिले. त्यावेळी मला गर्दीतून खाली आणलं गेलं. उद्धव ठाकरे माझ्यासाठी असे थांबले आहेत, हे समजल्यावर मला थोडं संकोचल्यासारखंच झालं. ते मला म्हणाले की, तू आल्याशिवाय मला तुझं कौतुक करायचं नव्हतं. त्यामुळे राजकीय दृष्टीने मला कोणताही कोणाचाही त्रास झाला नाही.”
“जर ही भूमिका आता करून नाही दाखवली, तर आपल्या करिअरला काही अर्थ उरणार नाही. ही भूमिका जीव ओतूनच केली पाहिजे.. मग त्यासाठी पक्ष काय, विचारधारा काय.. हे सर्व बाजूलाच राहिलं. माझं दुर्दैव असं आहे की मी आनंद दिघेंना कधी भेटलो नाही. त्यामुळे ऐकीव माहितीतून मी त्या भूमिकेवर मेहनत घेतली”, अशा शब्दांत प्रसाद व्यक्त झाला.