“मला घाणेरडा म्हणत असाल तर..”; किसिंग व्हिडीओनंतर उदित नारायण स्पष्टच बोलले

उदित नारायण हे 1980 पासून फिल्म इंडस्ट्रीत गायक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विविध भाषांमध्ये दोन हजारहून अधिक गाणी गायली आहेत. हिंदी, तेलुगू, कन्नड, तमिळ, बंगाली, ओडिया, भोजपुरी, सिंधी, नेपाळी, मल्याळम, आसामी, मैथिली यांसारख्या अनेक भाषांमध्ये त्यांनी लोकप्रिय गाणी गायली आहेत.

मला घाणेरडा म्हणत असाल तर..; किसिंग व्हिडीओनंतर उदित नारायण स्पष्टच बोलले
Udit Narayan
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 02, 2025 | 10:53 AM

प्रसिद्ध गायक उदित नारायण सध्या त्यांच्या एका वादग्रस्त व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान एका चाहतीच्या ओठांना किस करतानाचा त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शनिवारी सकाळपासूनच उदित नारायण यांचा हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आणि त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. पद्मश्री आणि पद्मभूषणसारख्या पुरस्कारांनी सन्मानित गायकाचं असं वर्तन शोभून दिसत नाही, अशी टीका अनेकांनी केली. मात्र भर कॉन्सर्टमध्ये चाहतीला किस केल्याबद्दल कसलीही लाज वाटत नसल्याचं आणि त्यात माफी मागण्यासारखं काहीच नसल्याचं उदित यांनी स्पष्ट केलं.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत उदित यांनी सांगितलं की त्यांच्या एका जुन्या आंतरराष्ट्रीय कॉन्सर्टमधील तो व्हिडीओ होता. आता अचानक तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यामागे काहीतरी संशयास्पद असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. याविषयी ते म्हणाले, “त्या व्हिडीओबद्दल नक्कीच काहीतरी संशयास्पद आहे. अचानक तो व्हिडीओ कसा काय व्हायरल होतो? अमेरिका किंवा कॅनडामध्ये मी काही महिन्यांपूर्वी परफॉर्म केलं होतं. तेव्हाचा व्हिडीओ आता का व्हायरल होतोय? तुम्ही मला खाली पाडण्यासाठी जितके जास्त प्रयत्न कराल, तितका मी वर जाईन.”

कॉन्सर्टमध्ये चाहतीला किस केल्याच्या त्या कृत्याबद्दल तुम्हाला पश्चात्ताप वाटतो का, असा प्रश्न विचारल्यावर उदित नारायण पुढे म्हणाले, “नाही, अजिबात नाही. मला कशाला लाज वाटेल? ते काही गलिच्छ किंवा गोपनीय नव्हतं. सार्वजनिक ठिकाणी ती गोष्ट घडली होती. माझं मन पवित्र आहे. शुद्ध प्रेमाच्या कृतीत जर काही लोकांना घाणेरडंच पहायचं असेल तर मला त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं. उलट त्यांनी या व्हिडीओला घाणेरडं म्हटल्याने मला अधिक प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे मी त्यांचे आभारच मानतो.”

चाहतीला किस केल्याच्या घटनेबद्दल उदित यांनी आपली बाजू मांडली. “चाहते आणि माझ्यात अत्यंत खोल, पवित्र आणि कधीही न तुटणारं नातं आहे. त्या तथाकथित निंदनीय व्हिडीओमध्ये तुम्ही जे पाहिलंत, ते माझ्या आणि माझ्या चाहत्यांमधील प्रेम दर्शवणारी एक कृती होती. ते माझ्यावर प्रेम करतात आणि मी त्यांच्यावर अधिक प्रेम करतो”, असं त्यांनी स्पष्ट केलं.