Vandana Gupte : थांबा! नाहीतर पहिला खून माझाच होईल…वंदना गुप्ते यांचे पती बाळासाहेबांना असं का म्हणालेले? अभिनेत्रीनं सांगितलेला किस्सा
Vandana Gupte : वंदना गुप्ते यांनी एका जुन्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरेंचा आणि त्यांचे पती शिरीष गुप्ते यांचा किस्सा सांगितला आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी आपल्या अभिनयानं नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अभिनयाप्रमाणेच त्यांचे अनेक किस्सेही चर्चेत असतात. एका मुलाखतीत त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधित एक मजेशीर आठवण सांगितली. वंदना गुप्ते यांच्या काळजीपोटी बाळासाहेबांनी त्यांना बंदुकीचं लायसन्स काढून देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्यावर त्यांचे पती अॅड. शिरीष गुप्ते यांनी मजेशीर उत्तर दिलेलं,
रात्री उशिरापर्यंत असायचे नाटकांचे प्रयोग
वंदना गुप्ते यांनी अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले-रानडे यांना ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की, नाटकांचे प्रयोग असल्यामुळे अनेकदा रात्री दीड-दोन वाजेपर्यंत घरी पोहोचायला व्हायचं. मात्र, त्यावेळी रात्री उशिरा येण्या-जाण्याची त्यांना कधी भीती वाटली नाही. याबाबत त्या फारशी काळजीही करत नव्हत्या.
वंदना गुप्ते यांच्या कुटुंबाचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. बाळासाहेब त्यांना प्रेमानं ‘भूत’ म्हणायचे. त्यामुळे ते अनेकदा शिरीष गुप्ते यांच्याकडे वंदना कुठे आहेत, अशी विचारणा करायचे. एकदा वंदना रात्री उशिरा घरी येत असल्याची बाब लक्षात घेऊन बाळासाहेबांनी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी व्यक्त केली. तेव्हा त्यांनी शिरीष गुप्ते यांना विचारलं की, वंदना एवढ्या उशिरा येतात-जातात, तर त्यांच्यासाठी बंदुकीचं लायसन्स काढून देऊ का? बाळासाहेबांच्या या प्रश्नावर शिरीष गुप्ते यांनी अतिशय मिश्कील उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘नको, नाहीतर पहिला खून माझाच होईल!’ शिरीष गुप्ते यांचं हे उत्तर ऐकून वंदना गुप्ते यांनाही हसू आवरलं नाही. हा किस्सा सांगताना त्या स्वतःही खळखळून हसल्या.
वंदना गुप्ते यांची मनोरंजनविश्वात मोठी कारकीर्द
वंदना गुप्ते यांनी गेली अनेक दशकं मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘बाईपण भारी देवा’, ‘डबल सीट’, ‘टाईमपास’, ‘बकेट लिस्ट’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतील त्यांच्या भूमिकेचीही विशेष चर्चा झाली होती. रंगभूमीवरही त्यांनी अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केलं आहे. ‘चारचौघी’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘सुंदर मी होणार’, ‘शू… कुठे बोलायचं नाही’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
वंदना गुप्ते या ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या कन्या आहेत. १९७३ मध्ये त्यांचा अॅड. शिरीष गुप्ते यांच्याशी लग्न केलं.
