21 वर्षांपासून दिवाळीत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये वाजतं हे गाणं, प्रचंड सुपरहिट, बनले करोडो रील्स
दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये वाजतं हे 2005 मधील गाणं. चित्रपट फ्लॉप झाला पण हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. आजही याच गाण्यावर बनत आहेत लाखो रील्स.

दिवाळीचा सण म्हटलं की घराची सजावट, रोषणाई, नवीन कपडे, फराळ आणि कुटुंबीयांसोबतचा आनंद हे सगळं आलंच. दिवाळीच्या निमित्ताने अनेकजण मित्र-परिवारासोबत फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर करतात. या फोटोंना आकर्षक गाण्यांची जोडही दिली जाते. मात्र, दरवर्षी दिवाळीच्या काळात सोशल मीडिया स्टोरी आणि रील्सवर एक खास गाणं आवर्जून ऐकायला मिळतं. ते म्हणजे ‘मेरे तुम्हारे सबके लिए हैप्पी दिवाली’.
विशेष म्हणजे, हे गाणं 2005 मध्ये रिलीज झालेल्या ‘होम डिलिव्हरी’ या चित्रपटातील आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारशी कमाई करू शकला नव्हता. मात्र, चित्रपटातील हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. दिवाळीच्या काळात या गाण्याची लोकप्रियता आणखी वाढते.
सुनिधी चौहानसह अनेक गायकांचा आवाज
‘मेरे तुम्हारे सबके लिए हैप्पी दिवाली’ हे गाणं प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांच्यासह वैशाली, सुरती, दिव्या, सूरज आणि इतर गायकांनी गायले आहे. या गाण्याला संगीतकार विशाल-शेखर यांनी संगीत दिले असून, त्याचे बोल विशाल ददलानी यांनी लिहिले आहेत. गाण्याचे उत्साही संगीत आणि दिवाळीचा आनंद व्यक्त करणारे शब्द यामुळे हे गाणं सोशल मीडियावर विशेष लोकप्रिय झालं आहे.
चित्रपटातील शाळेच्या कार्यक्रमात चित्रीकरण
या गाण्याचं चित्रीकरण चित्रपटात लहान मुलांच्या शाळेतील दिवाळी कार्यक्रमादरम्यान करण्यात आलं आहे. या प्रसंगात सर्व मुलं आनंदाने कार्यक्रमात सहभागी होत असतात. मात्र, एक मुलगी उदास बसलेली असते. काही वेळाने तिचे आई-वडील तिथे येतात. त्यांना पाहताच ती आनंदी होते आणि इतर मुलांसोबत स्टेजवरील कार्यक्रमात सहभागी होते. या भावनिक प्रसंगामुळे गाण्याला एक वेगळीच रंगत आली आहे.
काय आहे ‘होम डिलिव्हरी’ चित्रपटाची कथा?
‘होम डिलिव्हरी’ हा 2005 मध्ये प्रदर्शित झालेला रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. सुजॉय घोष यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. चित्रपटात विवेक ओबेरॉय, आयशा टाकिया, बोमन इराणी आणि महिमा चौधरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला अपेक्षित यश मिळालं नाही; मात्र त्यातील ‘हॅप्पी दिवाली’ हे गाणं आजही दिवाळीच्या उत्सवाचा अविभाज्य भाग बनलं आहे. विशेष म्हणजे, चित्रपट रिलीज होऊन जवळपास दोन दशके उलटली तरी या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.
