
ज्येष्ठ बॉलिवूड अभिने, ही-मॅन ते धर्मेंद्र आता आपल्यात नाहीत. आज सकाळी त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी मुंबईतील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले धर्मेंद्र बराच काळ रुग्णालयात होते, गेल्या आठवड्यातच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि ते घरी परतले. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र आज सकाळी घरीच त्यांचे निधन झाले. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यातआले.
बॉलिवूडचा “ही-मॅन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांची चित्रपट कारकीर्द उत्तम होती आणि त्यांनी राजकारणातही हात आजमावला. पण, त्यांचा तिथला प्रवास त्यांच्या चित्रपटांइतका यशस्वी झाला नाही.त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दलही जाणून घेऊया.
कसं ठेवलं राजकारणात पाऊल ?
2004 साली धर्मेंद्र यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्विंग इंडिया मोहिमेने प्रेरित होऊन राजकारणात प्रवेश केला. या काळात त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली.हीच भेट त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिले पाऊल ठरली. भाजपने त्यांना राजस्थानमधील बिकानेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून नामंकन दिलं. त्यावेळी धर्मेंद्र यांनी काँग्रेसचे उमेदवार रामेश्वर लाल दुडी यांचा जवळजवळ 60 हजार मतांनी पराभव करून निवडणूक जिंकली आणि ते संसदेत पोहोचले.
छोटीशी राजकीय कारकीर्द
पण धर्मेंद्र यांना राजकारण आवडत नव्हते. त्यांच्या प्रसिद्ध ‘शोले’ चित्रपटातील एका संवादाचा संदर्भ देत त्यांनी म्हटले होते की जर सरकारने त्यांचे ऐकले नाही तर ते संसदेच्या छतावरून उडी मारतील. मात्र मोठा विजय मिळवत ते खासदार झाले. असे असले तरीही संसदेत कमी उपस्थिती यामुळेच त्यांचा कार्यकाळ जास्त चर्चेत होता.
त्यांचे चित्रपट जेवढे गाजले, तेवढी त्यांची राजकीय कारकीर्द यशस्वी नव्हती. त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ते संसदेत फक्त काही वेळा उपस्थित राहिले.खासदार धर्मेंद्र हे या भागात वारंवार फिरकत नाहीत किंवा जनतेशी संवाद साधत नाहीत असा आरोप बिकानेरच्या लोकांनी केला होता. धर्मेंद्र हे त्यांचा बहुतेक वेळ चित्रपटांच्या चित्रीकरणात किंवा त्यांच्या फार्महाऊसवर घालवत असत.