
Vivek Oberoi : 2003 मध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयने एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्याने अभिनेता सलमान खानवर अनेक गंभीर आरोप केले होते. सलमानकडून धमकावलं जात असल्याचाही खुलासा त्याने पत्रकारांसमोर केला होता. त्यावेळी विवेक अभिनेत्री ऐश्वर्या रायला डेट करत होता. विवेकला डेट करण्यापूर्वी ऐश्वर्या आणि सलमान खान रिलेशनशिपमध्ये होते. पत्रकार परिषद घेऊन सर्वकाही जगासमोर आणू, असा विचार विवेकने केला होता. परंतु त्यानंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. त्याच्या करिअरवर सर्वाधिक परिणाम झाला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक आयुष्यातील त्या कठीण काळाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. आता मागे वळून त्या गोष्टींकडे पाहिल्यावर हसू येत असल्याचं त्याने म्हटलंय.
प्रखर गुप्ताला दिलेल्या मुलाखतीत विवेक म्हणाला, “मला लक्षात नाही किंवा पर्वा नाही की माझ्यासोबत काय घडलं होतं. परंतु ज्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोरून जात नाही, त्या म्हणजे माझ्या आईच्या चेहऱ्यावरील काळजी आणि वडिलांच्या चेहऱ्यावरील चिंता. एकंदरीत मी त्या सर्व आठवणींना दूर सोडून पुढे आलोय. कारण त्या आठवणींतूनच नकारात्मक भावनांचा जन्म होतो.” यावेळी विवेकने सांगितलं की त्याच्या कुटुंबीयांना धमक्यांचे कॉल्स यायचे. “त्यावेळी एक क्षण असा आला होता, जेव्हा प्रत्येकजण मला नाकारत होता. माझ्यासोबत काम करण्यासाठी कोणीच तयार नव्हतं. ज्या चित्रपटांना मी आधीच साइन केलं होतं, त्यातूनही मला बाहेर काढण्यात आलं होतं”, असं तो पुढे म्हणाला.
त्या पत्रकार परिषदेनंतर विवेकच्या कुटुंबीयांनाही धमक्यांचे खूप सारे मेसेज आणि कॉल्स यायचे. “माझ्या बहिणीला, आईला, वडिलांना धमक्या यायचे. माझं खासगी आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. मी नैराश्यात होतो. मी माझ्या आईच्या कुशीत जाऊन खूप रडलो. मीच का, असा प्रश्न मी तिच्यासमोर केला. तेव्हा ती इतकंच म्हणाली की, जेव्हा तू पुरस्कार जिंकलास, चित्रपटांमधून लोकप्रियता मिळवली, चाहते तुला फॉलो करत होते, तेव्हा तू हा प्रश्न विचारलास का? मग आताही नको विचार करूस”, असं विवेकने सांगितलं.