
अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता यांना अनिकेत हा एकुलता एक मुलगा आहे. अशोक यांचं त्यांच्या मुलासोबत नातं कसं आहे, याविषयी निवेदिता ‘मी बहुरुपी’ या अशोक सराफांच्या आत्मचरित्रात मोकळेपणे व्यक्त झाल्या. अनिकेत लहान होता, तेव्हा त्याची वडिलांशी खूप जवळीक होती. त्यावेळी अशोक सराफ त्यांच्या कामात खूप व्यग्र असायचे. तरीसुद्धा वेळात वेळ काढून ते अनिकेतला सायकल चालवायला शिकवायचे. मुलासोबत वेळ घालवता यावा यासाठी ते आवर्जून प्रयत्न करायचे. पण अनिकेत मोठा व्हायला लागला तसतशी त्यांच्यात एक दरी निर्माण झाली. इतकी ही प्रसंगी निवेदिता यांना मध्यस्थाची भूमिका निभावावी लागायची.
अनिकेत आणि अशोक सराफ यांच्यातील संवादही हळूहळू कमी व्हायला लागला होता. अनिकेतविषयी काही बोलायचं असेल किंवा त्याला काही सांगायचं असेल तर अशोक निवेदिता यांच्याशी बोलायचे आणि अनिकेतला त्याच्या वडिलांबद्दल काही बोलायचं असेल तर तोही निवेदिता यांच्याकडेच यायचा. ते दोघं एकमेकांबरोबर संवादच साधू शकत नव्हते, असं निवेदिता यांनी सांगितलं. त्यामुळे मोकळेपणे बोलण्याची गोष्ट तर दूरच राहिली. याला दोघांच्या वयातील अंतर कारणीभूत असावं किंवा त्यांचे स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध असल्याने दुरावा निर्माण झाला असावा असं त्या म्हणाल्या.
अशोक सराफ आणि अनिकेत यांच्यातली ही दरी नंतर हळूहळू बुजलीसुद्धा. एक दिवस अनिकेत त्याच्या वडिलांजवळ जाऊन बसला आणि मग दोघं गप्पा मारू लागले. त्या दोघांच्या नात्यातला गुंता सुटला आणि त्यानंतर दोघं एकमेकांच्या खूप जवळ आले. अनिकेतमुळे अशोक सराफही खूप बदलले. तरुण पिढी कसा विचार करते, आपल्यापेक्षा ती किती वेगळी आहे, आपण त्यांना कसं समजून घ्यायला हवं, याची जाणीव त्यांना झाली.
शेफ होण्यासाठी अनिकेतने जेव्हा परदेशात जायचं ठरवलं होतं, तेव्हा तो निर्णय अशोक सराफ यांना फारसा पसंत नव्हता. परंतु आपली मतं आपण आपल्या मुलांवर लादता कामा नये, त्यानं घेतलेल्या निर्णयामुळे तो सुखी होणार असेल तर त्यात आपणही आनंद मानायला हवं, हे आम्हा दोघांनाही समजलंय, असं निवेदिता यांनी स्पष्ट केलं.