हे लग्न टिकणार नाही असं अनेकांना वाटलेलं..; अशोक सराफांबद्दल काय म्हणाल्या निवेदिता?
अशोक आणि निवेदिता सराफ ही मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांच्या लग्नाला तीस वर्षे उलटून गेली आहेत. वयातील अंतरामुळे अनेकांनी त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. लग्नातील आव्हानांबद्दल खुद्द निवेदिता व्यक्त झाल्या होत्या..

मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या लग्नाला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. 27 जून 1989 रोजी या दोघांनी गोव्यातील मंगेशीच्या देवळात लग्नगाठ बांधली. या दोघांच्या वयात 18 वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. ‘मी बहुरुपी’ या अशोक सराफांच्या आत्मचरित्रात खुद्द निवेदिता या त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या होत्या. “आज इतकी वर्षे झालीत आमच्या लग्नाला. हे लग्न टिकणार नाही असं त्यावेळी अनेकांना वाटलं होतं. अनेकांनी मला तसं बोलूनही दाखवलं होतं. लग्न करायचं तर ते टिकवण्यासाठी असं मी पक्कं ठरवलं होतं,” असं त्यांनी म्हटलंय.
“प्रत्येक लग्नाच चढउतार असतात. त्याप्रमाणे आमच्याही आयुष्यात आले. आमचीही भांडणं झाली, वादविवाद झाले. आमच्या वयात खूप जास्त अंतर आहे. आमचे स्वभाव निरनिराळे, विचारसरणीत फरक आणि आम्ही ज्या सामाजिक स्तरातून आलो तोही वेगळा. त्यामुळे अनेकदा भांड्याला भांडं लागण्याचे प्रसंग आले. आम्ही सगळ्या भोज्यांना शिवून आलो. परंतु आजही आम्ही एकमेकांच्या बाजूला ठामपणे उभे आहोत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आम्हा दोघांना एकमेकांविषयी वाटत असलेला आदर,” अशा शब्दांत निवेदिता व्यक्त झाल्या.
View this post on Instagram
लग्न टिकवण्याबद्दल त्यांनी पुढे लिहिलं, “आज इतकी वर्षे झालीत आमच्या लग्नाला. हे लग्न टिकणार नाही असं त्यावेळी अनेकांना वाटलं होतं. अनेकांनी मला तसं बोलूनही दाखवलं होतं. लग्न करायचं तर ते टिकवण्यासाठी असं मी पक्कं ठरवलं होतं. त्यासाठी लागतील ते आणि तेवढे प्रयत्न करण्याची माझी तयारी होती. कारण कोणतंही लग्न आपोआप टिकत नाही, त्यासाठी मेहनत करावीच लागते, असं मला वाटतं, तशी मी केलीये. त्यासाठी प्रसंगी माझ्या करिअरशी तडजोडही केलीये. स्वत:ला बदललंय. अर्थात हे मी एकटीनेच केलंय असं नाही. अशोकनंही त्याच्या बाजूनं तेच केलंय. या नात्याशी शंभर टक्के बांधिलकी मानणारा नवरा मला मिळाला म्हणून मी स्वत:ला अतिशय नशीबवान मानते. माझं सुखाचं आणि समाधानाचं पारडं खूप जास्त जड आहे.”
“अशोकचं कौतुक हे की त्यानंही मला खूप समजून घेतलं. अतिशय रुढिप्रिय माणून असूनसुद्धा त्यानं कधीही आपले विचार माझ्यावर लादले नाहीत. मी तुलनेनं आधुनिक विचारांची आहे. त्यानं मला माझ्या पद्धतीनं जगू दिलं. कधी भांडून असेल, कधी माझ्यावरच्या प्रेमामुळे असेल, पण माझ्या स्वातंत्र्यावर त्यानं कधी बंधन घातलं नाही,” असं त्या पुढे म्हणाल्या.
