गोव्यातील ‘या’ देवळात झालं होतं अशोक सराफ यांचं लग्न; वडील राहू शकले नव्हते उपस्थित
अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचं लग्न कसं पार पडलं होतं, त्या लग्नाला कोण कोण उपस्थित होते, याविषयी त्यांनी 'मी बहुरुपी' या आत्मचरित्रात सविस्तर सांगितलं आहे. या लग्नाला अशोक सराफ यांचे वडील उपस्थित राहू शकले नव्हते.

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. या दोघांच्या वयात पंधरा वर्षांचं अंतर आहे. अशोक आणि निवेदिता यांची प्रेमकहाणी अनेकांना माहीत असली तरी त्यांचं लग्न कसं झालं, हे फार क्वचित लोकांना माहीत असेल. लग्नाविषयीचा किस्सा खुद्द अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात सांगितला आहे. एप्रिल 1987 मध्ये त्यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातातून ते चमत्कारिकरित्या बचावले होते. याच अपघाताच्या दोन वर्षांनंतर 27 जून 1989 रोजी ते बोहोल्यावर चढले. गोव्यातील मंगेशीच्या देवळात लग्न व्हावं अशी त्यांच्या आईची इच्छा होती. कारण मंगेश हे सराफ कुटुंबाचे कुलदैवत. शिवाय अशोक सराफ यांचीही कुलदैवतांवर खूप श्रद्धा आहे. कधीही गोव्याला गेले तर ते मंगेशीच्या देवळात जाऊन यायचेच. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या लग्नाच्या तयारीसाठी फार वेळ नव्हता. जवळच्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न करावं अशी दोघांचीही इच्छा होती.
सचिन पिळगांवकर, मच्छिंद्र कांबळी, गिरीश घाणेकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रुही, अजय सरपोतदार हे सर्वजण या लग्नाला उपस्थित होते. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे आईवडील गोव्याचेच असल्याने तेसुद्धा लग्नाला उपस्थित होते. परंतु अशोक सराफ यांचे वडील आजारी असल्यामुळे या लग्नाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे अशोक सराफ यांचा मावसभाऊ जयमराम खवटे यांनी लग्न लावलं. लग्नाचे सर्व विधी त्यांच्या हस्ते पार पडले. तर निवेदिता यांचं कन्यादान करण्यासाठी त्यांचे मामी-मामी आले होते.
View this post on Instagram
लग्नानंतर वर्षभरातच निवेदिता यांनी मुलगा अनिकेतला जन्म दिला. ‘आमच्यासारखे आम्हीच’ या चित्रपटाचं डबिंग सुरू असतानाच्या काळात अनिकेतचा जन्म झाला. त्यामुळे या चित्रपटातील निवेदिता यांचं डबिंग त्यांची बहीण मीनल यांनी केलं होतं. निवेदिता, मीनल आणि त्यांची आई या तिघींचा आवाज इतका सारखा आहे की फोनवरही अनेकदा फसायला होता, असं अशोक सराफांनी या आत्मचरित्रात सांगितलं.
