पाकिस्तानी क्रिकेटर वसिम अक्रमशी लग्नाच्या चर्चांवर सुष्मिता सेन म्हणाली..

अभिनेत्री सुष्मिता सेनने पाकिस्तानी क्रिकेटर वसिम अक्रमशी लग्नाच्या चर्चांवर मौन सोडलं होतं. ट्विटरवर तिने एक पोस्ट लिहिली होती. या दोघांनी एका डान्सिंग शोमध्ये एकत्र काम केलं होतं. त्या शोमध्ये दोघंही परीक्षक होते.

पाकिस्तानी क्रिकेटर वसिम अक्रमशी लग्नाच्या चर्चांवर सुष्मिता सेन म्हणाली..
Wasim Akram and Sushmita Sen
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 03, 2025 | 8:32 PM

अभिनेत्री सुष्मिता सेन अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येते. कधी रोहमन शॉल तर कधी ललित मोदी.. सुष्मिता तिच्या अफेअर्समुळे कायम प्रकाशझोतात राहिली. 2010 च्या सुरुवातीला सुष्मिताचं नाव पाकिस्तानी क्रिकेटर वसिम अक्रमशी जोडलं गेलं होतं. इतकंच काय तर हे दोघं एकमेकांशी लग्न करणार असल्याच्याही चर्चा होत्या. परंतु सुष्मिताने लगेच त्यावर प्रतिक्रिया देत चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यावेळी वसिमनेही अफेअरच्या चर्चांना नाकारत सुष्मिता ही अत्यंत सुंदर आणि सर्वांत सभ्य स्त्री असल्याचं म्हटलं होतं. वसिम आणि सुष्मिता यांना ‘एक खिलाडी एक हसीना’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. हे दोघं या शोमध्ये परीक्षक होते. त्यावेळी दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर 2013 मध्ये थेट दोघांच्या लग्नाचं वृत्त समोर आलं होतं.

सुष्मिताने त्यावेळी ट्विटरवर पोस्ट लिहित लग्नाच्या वृत्तांना खोटं म्हटलं होतं. ‘वसिमसोबत माझ्या लग्नाच्या बातम्या वाचत होती. धादांत खोटी बातमी आहे ही. कधीकधी मीडिया किती बेजबाबदार असू शकते, हे दिसून येतंय. वसिम अक्रम हा माझा मित्र आहे आणि तो कायम मित्र राहील. त्याच्या आयुष्यात एक सुंदर मुलगी आहे. अशा पद्धतीच्या अफवा या अनादरनीय आहेत. माझ्या आयुष्यात जेव्हा एखादी व्यक्ती येईल, तेव्हा तुम्हालाच सर्वांत आधी कळवेन’, असं तिने लिहिलं होतं.

वसिमनेही लग्नाच्या चर्चा फेटाळत एएफपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता, “अशा प्रकारच्या अफवांना नाकारून मी आता थकलोय. हे सगळं पूर्णपणे थांबावं अशी माझी इच्छा आहे. सुष्मिता ही अत्यंत सभ्य स्त्री आहे. तिच्यासोबत परीक्षक म्हणून काम करण्याचा अनुभव खूप मजेशीर होता. ती अत्यंत प्रोफेशनल व्यक्ती आहे.”

2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुलतान: अ मेमॉइर’ या पुस्तकात वसिम अक्रमने सुष्मिता सेनचा आवर्जून उल्लेख केला होता. तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नव्हतं, असं त्याने या पुस्तकात लिहिलं होतं. 2009 मध्ये पत्नी हुमाच्या निधनानंतर अनेक महिलांसोबत माझं नाव जोडलं गेलं आणि सुष्मिता त्यापैकीच एक होती, असंही त्याने त्यात म्हटलं होतं. नंतर 2013 मध्ये वसिमने शानेरा अक्रमशी लग्न केलं.