
Hema Malini : बॉलिवूडमधील सर्वात अजरामर आणि कल्ट क्लासिक ठरलेला चित्रपट ‘शोले’ गेल्या वर्षी आपल्या प्रदर्शनाच्या 50 वर्षांचा टप्पा पूर्ण करून गेला. 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. ‘शोले’ केवळ व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला नाही तर त्यातील व्यक्तिरेखा, संवाद, गाणी आणि कथानक यांमुळे तो आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.
‘शोले’ हा चित्रपट वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाच्या सुवर्णजयंतीनिमित्त पुन्हा एकदा ‘शोले’च्या आठवणी ताज्या झाल्या, जेव्हा अभिनेत्री हेमा मालिनी आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी हेमा मालिनी यांच्या निवासस्थानी भेटले. या खास प्रसंगी ‘शोले’च्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त रमेश सिप्पी यांचा फोटो असलेल्या एका विशेष मासिकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना हेमा मालिनी यांनी ‘शोले’ संदर्भात एक मजेशीर आणि हटके किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की, त्यांना ‘शोले’मधील व्यक्तिरेखा प्रत्यक्ष आयुष्यात जगताना पाहायला आवडेल. चित्रपटाची कथा पुन्हा कल्पनेत रंगवताना त्या म्हणाल्या, ‘असं वाटतं की धरमजी आहेत, मी आहे आणि आमचं लग्न झालं आहे, पण अगदी ‘शोले’च्या अंदाजात. तेच कपडे, तेच पात्र आणि आम्ही आनंदाने आयुष्य जगत आहोत. रामनगर गावात सगळे लोक राहतात. कथेत अमितजी ठाकूर आहेत, गब्बरही आहे. मी गावात कुक म्हणून सगळ्यांच्या घरी जाऊन जेवण बनवते. गब्बर समोसेवाला आहे, त्याची दुकान आहे आणि तो समोसे विकतो.’
या गाण्यात हेमा मालिनींनी केलं कडक उन्हात नृत्य
हेमा मालिनी यांनी चित्रपटातील आयकॉनिक गाणे ‘जब तक है जान’च्या शूटिंगचा अनुभवही सांगितला. त्या म्हणाल्या की, कडक उन्हात गरम दगडांवर अनवाणी नृत्य करणे अत्यंत कठीण होते. माझी आई मला गरम दगडांवर नाचताना पाहून फारच चिंतेत होती आणि तिला ते अजिबात आवडत नव्हते. पण तो सीन खूप महत्त्वाचा होता आणि मी पूर्ण मेहनतीने तो पूर्ण केला असे त्यांनी सांगितले.
आजही ‘शोले’ हा चित्रपट केवळ एक सिनेमा न राहता भारतीय चित्रपटसृष्टीचा अमूल्य वारसा मानला जातो. पन्नास वर्षांनंतरही त्याची जादू कायम असून, नव्या पिढीतील प्रेक्षकांनाही तो तितकाच भावतो हेच या चित्रपटाचे खरे यश आहे.