
दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या एका खळबळजनक घटनेने सर्वांना हादरवून सोडले. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आणि रेस्टॉरंट व्यवसायी आसिफ कुरेशी (42) याची दोन तरुणांनी टोकदार वस्तूने हल्ला करून हत्या केली. स्कूटर पार्किंगवरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आता आसिफ कुरेशी कोण होता? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी..
कोण होते आसिफ कुरैशी?
आसिफ कुरेशी हे दिल्लीतील निजामुद्दीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी होते. ते बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी यांचे चुलत भाऊ (काकांचा मुलगा) होते. 42 वर्षीय आसिफ यांचे लग्न झाले होते आणि ते त्यांच्या पत्नी शाइना आणि कुटुंबासह राहत होते. त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता, ज्यामध्ये ते रेस्टॉरंट आणि हॉटेल्सना चिकन पुरवठा करत होते.
वाचा: माझं एका राजकीय नेत्याशी लग्न झालंय आणि…; चर्चांवर अखेर सोनाली कुलकर्णीनं सोडलं मौन
आसिफ यांनी केली होती दोन लग्ने
आसिफ यांनी दोन लग्ने केली होती. त्यांच्या पहिल्या पत्नीपासून त्यांचा घटस्फोट झाला नव्हता, परंतु ते बहुतेक वेळा त्यांच्या दुसऱ्या पत्नी शाइना यांच्यासोबत राहत होते. शाइना यांनी सांगितले की, त्यांनी 2018 मध्ये प्रेमविवाह केला होता. शाइना यांचे मूळ नाव रेनू जैन होते, ज्यांनी धर्म परिवर्तन करून इस्लाम स्वीकारला होता. आसिफ यांचे त्यांच्या पहिल्या पत्नीशी संबंध फारसे राहिले नव्हते आणि ते मुख्यतः शाइना यांच्यासोबतच राहत होते. हुमा कुरेशी यांचे वडील सलीम यांनीही सांगितले की, आसिफ बहुतेक वेळा त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबतच राहत होते.
वाद कसा सुरू झाला?
माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री जंगपुरा भोगल बाजार लेनमध्ये पार्किंगवरून वाद झाला. आसिफ यांनी काही लोकांना त्यांच्या घराच्या गेटसमोर स्कूटर पार्क करु नका असे सांगितले. परंतु आरोपींनी त्यांचे ऐकले नाही. यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला. आसिफ यांच्या पत्नीने सांगितले की, शेजारच्या मुलांनी त्यांच्या घरासमोर स्कूटर लावली होती, ज्यामुळे दरवाजा अडकला होता. आसिफ यांनी त्यांना स्कूटर थोडी पुढे लावण्यास सांगितले, परंतु ते शिवीगाळ करू लागले. त्यानंतर एक मुलगा खाली आला आणि त्याने टोकदार वस्तूने आसिफ यांच्या छातीवर हल्ला केला. त्याच्यासोबत त्याचा भाऊही होता. हा हल्ला इतका भयानक होता की, आसिफ यांचा जागीच मृत्यू झाला.
हुमा कुरेशीचे दिल्लीशी नाते
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी यांचा जन्म आणि संगोपन दिल्लीत झाले आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या मुंबईला गेल्या. हुमा यांचे वडील सलीम कुरेशी दिल्लीत ‘सलीम’ या नावाने प्रसिद्ध रेस्टॉरंट चेनचे मालक आहेत. हुमा यांचे कुटुंब दिल्लीतच राहते, तर त्यांच्या आई काश्मिरी आहेत. हुमा यांना तीन भाऊ आहेत. त्यापैकी शाकिब सलीम हा अभिनेता आहे, तर बाकी दोन भाऊ त्यांच्या वडिलांसोबत व्यवसाय सांभाळतात.