झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट; तपास अधिकाऱ्यांचा कोर्टात मोठा खुलासा
प्रसिद्ध गायक झुबीन गर्गचं 19 सप्टेंबर 2025 रोजी निधन झालं होतं. त्याच्या मृत्यूप्रकरणाची सुनावणी नुकतीच सिंगापूर कोर्टात पार पडली. या सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती उघड केली आहे.

‘या अली’ गाण्यामुळे लोकप्रिय झालेला प्रसिद्ध आसामी गायक झुबीन गर्गचं 19 सप्टेंबर 2025 रोजी अचानक निधन झालं. सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंग करताना त्याचा मृत्यू झाला होता. सिंगापूरमध्ये पार पडणाऱ्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी तो तिथे गेला होता. फेस्टिव्हलच्या एक दिवस आधी मित्र आणि सहकाऱ्यांसोबत स्कूबा डाइव्हिंगसाठी गेलेल्या झुबीनचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याप्रकरणी सिंगापूर कोर्टात सुनावणी सुरू आहे. 14 जानेवारी रोजी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती दिली.
लाइफ जॅकेट घालण्यास दिला नकार
‘न्यूज एशिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्य तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं की, “झुबीन गर्गने सुरुवातला लाइफ जॅकेट घातला होता, परंतु नंतर त्याने ते काढून टाकलं. जेव्हा त्याला दुसरा लाइफ जॅकेट दिला, तेव्हा तोसुद्धा घालण्यास त्याने नकार दिला. त्यावेळी झुबीन खूप नशेत होता आणि काही प्रत्यक्षदर्शींनी त्याला जहाजाकडे पुन्हा पोहत येण्याचा प्रयत्न करताना पाहिलं होतं. तेव्हाच तो बेशुद्ध झाला आणि त्याचं शरीर पाण्यात तरंगताना दिसून आलं होतं.”
उच्च रक्तदाब, फिटचा त्रास
“झुबीनला जहाजावर लगेच आणण्यात आलं आणि त्याला सीपीआर देण्यात आला होता. परंतु त्याच दिवशी नंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. झुबीनला उच्च रक्तदाब आणि फिटची समस्या होती. 2024 मध्ये त्याला फिट आली होती. परंतु घटनेच्या दिवशी त्याने फिटचं त्याचं नियमित औषध घेतलं होतं की नाही हे स्पष्ट नाही. कारण प्रत्यक्षदर्शींचे पुरावे त्याने प्रत्यक्षात औषध घेतलं होतं की नाही हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाहीत”, असं त्यांनी पुढे स्पष्ट केलं.
नेमकं काय घडलं होतं?
चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार, सिंगापूर पोलिसांना झुबीनच्या मृत्यूप्रकरणात कोणत्याही कटाचा संशय नाही. या तपासात एकूण 35 साक्षीदारांना न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे. यामध्ये जहाजावरील प्रत्यक्षदर्शी, जहाजाचा कॅप्टन, पोलीस अधिकारी आणि पॅरामेडिक्स यांचाही समावेश आहे. या प्रकरणातील मुख्य त पास अधिकाऱ्याने कोर्टात सांगितलं की, जहाजावर झुबीनसह जवळपास 20 जण उपस्थित होते. यात त्याच्या मित्र आणि सहकाऱ्यांचाही समावेश होता. या सर्वांनी जहाजावरच नाश्ता केला आणि त्यासोबत मद्यपानही केलं होतं. अनेक प्रत्यक्षदर्शींनी झुबीनला मद्यपान करताना पाहिलं होतं.
तपास अधिकाऱ्याने त्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती दिली. “झुबीनने पहिल्यांदा पोहताना लाइफ जॅकेट काढलं होतं आणि नंतर तो थकल्याचं सांगत बोटीवर परतला होता. जेव्हा त्याने पुन्हा पोहायला सुरुवात केली, तेव्हा त्याला दुसरं लहान आकाराचं लाइफ जॅकेट देण्यात आलं होतं, परंतु त्याने ते घालण्यास नकार दिला. लाइफ जॅकेटशिवायच तो पाण्यात उतरला आणि लाझारस बेटाच्या दिशेने एकटाच पोहू लागला होता. झुबीनच्या शरीरावर काही जखमा आढळल्या, परंतु या जखमा सीपीआर आणि बचावाच्या प्रयत्नांदरम्यान झाल्या होत्या. त्याच्या रक्तात उच्च रक्तदाब आणि फिटसाठीची औषधं आढळली होती. याशिवाय इतर कोणतीही औषधं आढळली नाहीत”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
रक्तात अल्कोहोलचं प्रमाण अधिक
सिंगापूर कोर्टात सांगण्यात आलं की, प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये झुबीनच्या रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण प्रति 100 मिलीलीटरमध्ये 333 मिलीग्राम असल्याचं आढळलं. म्हणजेच झुबीन पूर्णपणे नशेत होता. पोलिसांनी झुबीनच्या हॉटेलच्या खोलीतून 750 मिलीलीटर स्कॉच व्हिस्कीची बाटलीदेखील जप्त केली. अनेक साक्षीदारांनी नोंदवलेल्या जबाबातून दिसून येतं की झुबीन स्वत:हून पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. त्याला पाण्यात ढकललं नव्हतं, असंही कोर्टात स्पष्ट करण्यात आलं.
भारतात झुबीनच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या एसआयटीने नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे आयोजक श्यामकानू महंता, झुबीनचा सचिव सिद्धार्थ शर्मा आणि त्याच्या बँडचे दोन सदस्य शेखरज्योती गोस्वामी आणि अमृतप्रव महंत यांच्यावर हत्येचा आरोप लावला आहे.