
Zubeen Garg : आसामचा प्रसिद्ध गायक झुबीन गर्गचं सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंगदरम्यान बुडून मृत्यू झाला. 19 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेनं देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला. मंगळवारी झुबीनच्या पार्थिवावर गुवाहाटीजवळील एका गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये झुबीन त्याच्या सहकाऱ्यांसोबत सिंगापूरमधील समुद्रात पोहताना दिसत आहे. पोहताना पूर्णपणे थकलेला झुबीन राफ्टच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करतो. यावेळी तो पूर्णपणे दमला असून त्याला श्वास घेण्यासह अडचण येत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
याआधी झुबीनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो लाइफ जॅकेट घालून समुद्रात उडी मारताना दिसला. त्यानंतर त्याचा हा दुसरा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये झुबीनने लाइफ जॅकेट घातलेलं नाही. त्याच्या मित्रांसोबत तो समुद्रात पोहताना दिसतोय. परंतु तो पूर्णपणे थकला आहे आणि त्याला श्वास घेताना खूप त्रास होत असल्याचं पहायला मिळतंय. एका क्षणानंतर तो पूर्णपणे थकतो आणि त्याच्या आजूबाजूला असलेले मित्र त्याच्याजवळ येऊन मदत करतात.
काही रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं गेलं की झुबीनने आधी लाइफ जॅकेट घालून समुद्रात पोहण्यासाठी उडी मारली होती. परंतु काही वेळानंतर तो जॅकेट काढण्यासाठी पुन्हा परत आला. लाइफ जॅकेटसह नीट पोहता येत नसल्याचं त्याने म्हटलं होतं. त्यानंतर तो पुन्हा जॅकेट काढून समुद्रात पोहण्यासाठी गेला. त्याचवेळी त्याचा मृत्यू झाल्याचं समजतंय. 19 सप्टेंबरला निधन झाल्यानंतर त्याचं पार्थिव रविवारी गुवाहाटीत आणलं गेलं. 23 सप्टेंबर रोजी शासकीय इतमामात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
झुबीन नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी सिंगापूरला गेला होता. झुबीनचं निधन पाण्यात बुडून झाल्याचा उल्लेख सिंगापूरमधील रुग्णालयाने जारी केलेल्या मृत्यू प्रमाणपत्रात करण्यात आला आहे. त्यानंतर गुवाहाटीत दुसऱ्यांदा त्याच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करण्यात आलं. झुबीनच्या अंत्यदर्शनला जनसागर लोटला होता. त्याला अंतिम निरोप देण्यासाठी असंख्य चाहते जमले होते. साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या कलाकाराला त्यांनी अंतिम निरोप दिला. गुवाहाटीपासून 300 किमी पूर्वेला असलेल्या झुबीनच्या मूळ गावी जोरहाट इथं त्याचं स्मारक बांधण्यात येणार असल्याचं सरकारने जाहीर केलं.