
तुमच्यापैकी अनेकजण नाईट शिफ्टमध्ये काम करत असतील किंवा इतर काही कारणांमुळे रात्री उशिरापर्यंत जागत असतील अशा लोकांसाठी चिंताजनक बातमी आहे. रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे आणि अनियमित दिनचर्येमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. एम्स भोपाळच्या नवीन संशोधनातून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
एम्समधील बायोकेमिस्ट्री विभागाचे प्राध्यापक डॉ. अशोक कुमार यांनी केलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की मानवी शरीर नैसर्गिक दिवस-रात्र चक्रावर चालते. याला आपण जैविक घड्याळ किंवा सर्कॅडियन लय म्हणतो. ही सायकल आपली झोप, हार्मोन्स, पचन, ऊर्जा पातळी आणि रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करते. मात्र जेव्हा हे चक्र उशिरापर्यंत जागल्यामुळे किंवा नाईट शिफ्टमध्ये काम केल्यामुळे विस्कळीत होते तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्याची आणि पसरण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी असेही सांगितले की, कर्करोगाच्या पेशी शरीराच्या ऊर्जा प्रणालीचा वापर स्वत:च्या विकासासाठी करू शकतात. त्यामुळे रोगप्रतिकारक पेशींना कर्करोगाच्या पेशींना रोखण्यात अपयश येते.
या संशोधनातून एक गोष्ट स्पष्ट होते की कर्करोग रोखण्यासाठी केवळ औषधे गरजेची नाहीत. नियमित आणि पुरेशी झोप, वेळेवर जेवण आणि संतुलित दैनंदिन दिनचर्या यामुळेही कर्करोगाचा धोका कमी होतो. संशोधकांनी असे म्हटले की, भविष्यात, कर्करोगाचा उपचार अधिक वैयक्तिकृत केला जाऊ शकतो, ज्यामध्ये रुग्णाची झोप, दैनंदिन दिनचर्या आणि जैविक घड्याळानुसार उपचार केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे उपचार अधिक प्रभावी होतील आणि औषधांचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होईल.
एम्सच्या डॉक्टरांनी लोकांना सल्ला देताना म्हटले की, ‘नियमित आणि वेळेवर झोपणे आणि उठणे, रात्री उशिरा मोबाईल फोन वापरणे टाळणे गरजेचे आहे. तसेच जेवण आणि व्यायामाचे वेळापत्रक देखील गरजेचे आहे. निरोगी जीवनशैलीमुळे केवळ सामान्य आजारच नव्हे तर कर्करोगासारख्या गंभीर आजारांनाही दूर ठेवण्यास मदत करू शकते.’
या संशोधनावर बोलताना एम्स भोपाळचे कार्यकारी संचालक आणि सीईओ प्रो. डॉ. माधवानंद कर म्हणाले की, ‘या संशोधनात झोपेचा आणि कर्करोगाचा संबंध सांगण्यात आलेला आहे. हे संशोधन केवळ वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचे नाही तर सामान्य लोकांमधील जागरूकता वाढवण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडेल.’