corona vaccination : तुम्हाला कोरोना लस आता मिळू शकते का? लस मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया

corona vaccination : तुम्हाला कोरोना लस आता मिळू शकते का? लस मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया
Maharashtra corona vaccine

corona vaccination process : येत्या 1 मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. जाणून घ्या कोरोना लसीकरणाबाबत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

सचिन पाटील

|

Feb 24, 2021 | 6:02 PM

नवी दिल्ली : देशातभरत 16 जानेवारीपासून सुरु झालेलं कोरोना लसीकरण आता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत येऊन पोहोचलं आहे. येत्या 1 मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. कोव्हिड योद्ध्यांना कोरोना लस टोचल्यानंतर आता ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. (All about to know corona vaccination process, registration, Questions and Answers, Benefits )

याशिवाय 45 वर्षांवरील सहव्याधी (कोमॉर्बिडीटीज) असलेल्या नागरिकांनाही लस दिली जाणार आहे. देशात 10 हजार सरकारी, तर 20 हजार खासगी केंद्रांवर कोरोना लस उपलब्ध असेल. त्यासाठी केंद्र सरकारने लसीकरणासाठी मेगा प्लॅन केला आहे.

आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त जणांना लस

आतापर्यंत भारतात एक कोटीपेक्षा जास्त लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी ते 24 फेब्रुवारी या दरम्यान कोव्हिड योद्ध्यांसह गंभीर आजार असणारे रुग्ण असे मिळून 1.07 कोटी जणांना कोरोना लस टोचण्यात आली. इतकंच नाही तर यापैकी 14 लाख लोकांना कोरोनाची दुसरी लसही देण्यात आली.

60 वर्षावरील ज्येष्ठांना लस

कोव्हिड योद्ध्यांनंतर आता सर्वसामान्य जनतेला कोरोनाची लस मिळणार आहे. येत्या सोमवारपासून 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे.

45 वर्षांवरील व्याधी असलेल्यांनाही लस

45 वर्षांवरील सहव्याधी (कोमॉर्बिडीटीज) असलेल्या नागरिकांनाही लस दिली जाणार आहे. वयोवृद्धांसह गंभीर स्वरुपाचे रुग्ण, अपंग व्यक्ती यांचा समावेश असेल.

सरकारी रुग्णालयात मोफत लस

येत्या एक मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळणार आहे. 10 हजार सरकारी, तर 20 हजार खासगी केंद्रांवर कोरोना लस उपलब्ध असेल.ज्या व्यक्तींना सरकारी केंद्रांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कोव्हिड लस घ्यायची असेल, त्यांना लसीचे पैसे मोजावे लागतील. त्या लसीचे दर केंद्रीय आरोग्य मंत्री येत्या तीन-चार दिवसात रुग्णालय प्रशासनांशी बोलून ठरवतील, अशी माहितीही जावडेकरांनी दिली.

निवडणुकीप्रमाणे कोरोना महालसीकरण मोहीम!

सध्या ज्येष्ठांना कोरोना लस देण्यासा सुरुवात होणार आहे. मात्र त्यानंतर ही लस सर्वसामान्यांसाठी, सर्व वयोगटासाठी उपलब्ध होऊ शकते. भारतात लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर कोरोना महालसीकरण मोहीम राबवली जाण्याची चिन्हं आहेत. प्रत्येक वॉर्डातल्या प्रत्येक शाळेत आणि सरकारी संस्थांमध्ये लसीकरणाचे बूथ उभारले जातील. ज्या बूथवर जाऊन तुम्हाला लस टोचून घ्यावी लागेल. यावेळी ऑनलाईन पद्धतीचाही अवलंब होईल, आणि ऑनलाईन टोकन घेतल्यानंतरच तुम्हाला तुमच्या जवळच्या कोरोना बूथवर लसीकरणासाठी जावं लागेल.

लसीकरणाचा कार्यक्रम कसा राबवला जाणार?

कोरोनाची लस घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे. या बुकिंगनंतर तुम्हाला तुमच्या घराजवळचा बूथ दिला जाईल. यासाठी सरकारतर्फे महालसीकरण अभियान सुरु केलं जाईल. यामध्ये दर 2 किलोमीटरच्या अंतरावर लसीकरणं बूथ उभारले जातील. बुकिंग केल्यानंतर तुम्हाला लसीकरणाची वेळ आणि बूथचा पत्ता SMS केला जाईल. यानुसार तुम्ही लसीकरण बूथवर जाऊन लस घेऊ शकता.

लसीकरण बूथवर लसीकरण कसं होणार?

लसीकरण बूथवर 3 खोल्या असणार आहेत, पहिल्या खोलीत तुमची सगळी कागदपत्र तपासली जातील. ज्यामध्ये तुमचं ओळखपत्र आणि इतर कागदपत्र असतील. एकाच व्यक्तीनं दोनदा लस घेऊ नये, आणि प्रत्येक व्यक्तीची नोंद करता यावी यासाठी ही नोंदणी असेल. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या खोलीत तुम्हाला लस दिली जाईल. लस दिल्यानंतर तुम्हाला ऑब्जरवेशन रुममध्ये पाठवलं जाईल. जिथं तुमच्यावर 30 मिनिटांपर्यंत लक्ष ठेवलं जाईल. लसीचा काही साईड इफेक्ट झालाच तर तातडीनं वैद्यकीय उपचार दिले जातील, नाहीतर तुम्हाला घरी सोडण्यात येईल. पहिल्या लसीनंतर पुन्हा 28 दिवसांनी दुसरी लस घेण्यासाठी यावं लागणार आहे.

राज्यात काय स्थिती?

राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरु आहे. जवळपास 652 केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत एकूण 5 लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्संना कोरोना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार असून त्याची नोंदणी साधारणपणे 1 मार्चपासून होऊ शकते, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

मुंबईत नगरसेवकांना लसीकरण

राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे कोरोना लसीकरण सुरु आहे. प्रत्येक आठवड्याला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज साधारणपणे 40 ते 45 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात आहे, असेही राजेश टोपे म्हणाले होते. तर 1 मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

भारतात कोणत्या लसी दिल्या जात आहेत?

भारतात सध्या कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी टोचल्या जात आहेत. कोव्हिशील्ड (Oxford-AstraZeneca’s Covishield) ही लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली आहे. हैदराबादची भारत बायोटेक कंपनी आणि ICMR ने मिळून कोव्हॅक्सिन (Bharat Biotech’s Covaxin) ही लस विकसित केली आहे. पहिल्या टप्प्यात 60 कोटी लोकांना लस टोचण्याचं ध्येय व्हॅक्सिन टास्क फोर्सचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांचं आहे.

कोरोना लस टोचून घेणं बंधनकारक आहे का?

कोरोनाची लस टोचून घेणं बंधनकारक नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कोरोनाची लस घेऊ शकता. कोणावरही लसीसाठी जबरदस्ती नाही. लस घेणं किंवा न घेणं ऐच्छिक असेल.

तुम्हाला आता लस मिळू शकते का?

सध्या सामान्य नागरिकांसाठी लस उपलब्ध नाही. कोव्हिड योद्धे, हायरिस्क कॉन्टॅक्टमधील कर्मचारी, आणि आता ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे.

लसीसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिड 19 व्हॅक्सिनसाठी Co-WIN App तयार केलं आहे. हे अॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यानंतर त्यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल. सध्या तरी सर्वांना या अॅपचा अॅक्सेस नाही.

(All about to know corona vaccination process, registration, Questions and Answers, Benefits )

संबंधित बातम्या  

एक मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस, जावडेकरांची घोषणा

Covishield vaccine A to Z | कोव्हिशिल्ड लसीचे किती डोस तयार, तुम्हाला कशी आणि किती रुपयात मिळणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें