फूड अॅलर्जी आहे की नाही कसे ओळखावे? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
पोटात गॅस होणे, अपचन होणे किंवा शरीरावर पुरळ येणे हे कोणत्याही आजाराचे लक्षण नाही. तर हे फुड ॲलर्जीची लक्षणे देखील असू शकतात. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला ॲलर्जी होत आहे का हे कसे ओळखावे तसेच यावर उपचार कसे करता येतील हे आजच्या लेखात तज्ञांकडुन जाणुन घेऊयात...

आपल्यापैकी अनेकांना धुळीची, धुराची, तसेच पदार्थांची ॲलर्जी होत असते. त्यात असे अनेकजण आहेत जे वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्याचे शौकीन आहेत. अशातच काही लोकांना प्रत्येक अन्नपदार्थ खायला आवडत नाही, कारण त्यांना विशिष्ट पदार्थांची ॲलर्जी असते. याला फूड अॅलर्जी म्हणतात. अशातच अनेकांना हे माहित नसते आपण खालेल्या कोणत्या पदार्थांमुळे आपल्या ॲलर्जी होत असते. तर अॅलर्जीची लक्षणे सहसा खाल्ल्यानंतर काही मिनिटांपासून ते दोन तासांत दिसून येतात, परंतु लोकं त्याला आजार मानतात आणि त्यानुसार डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेत असतात. अशातच जेव्हा तुम्ही एखादा आजार असल्याच्या कारणाने टेस्ट करता तेव्हा तो अहवाल देखील सामान्य येतो आणि समस्या काय आहे हे कळत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला तज्ञांनी सांगितलेल्या काही लक्षणांकडे लक्ष द्यावे लागेल, त्यानंतरच ॲलर्जी टेस्ट करावी लागेल.
यावेळी दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलच्या माजी वरिष्ठ रहिवासी आणि ऍलर्जिस्ट डॉ. नीता नायक सांगतात की ॲलर्जी कोणत्याही वयात होऊ शकते. म्हणजे एखाद्या बाळा जन्मत: ॲलर्जी होते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, लोकांना वर्षानुवर्षे माहित नसते की त्यांना विशिष्ट प्रकारच्या अन्नाची ॲलर्जी आहे. याला सायलेंट ॲलर्जी म्हणतात. कारण या सायलेंट ॲलर्जीमध्ये तुम्हाला लक्षणे खूप उशिरा दिसून येतात, परंतु जर काही खाल्ल्यानंतर तुम्हाला पोटात गॅस, अपचन, चेहऱ्यावर मुरुम यासारखी लक्षणे दिसली तर ही त्या अन्नाच्या ॲलर्जीची लक्षणे आहेत. हे लक्षात ठेऊन तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यानुसार उपचार करावे.
एखाद्या पदार्थाची ॲलर्जीची लक्षणे कशी ओळखावी ?
मेयोक्लिनिकच्या मते, जर काही खाल्ल्यानंतर काही तासांत त्वचेवर खाज सुटणे किंवा अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, चेहरा, ओठ, जीभ किंवा घसा सूज येणे, पोटदुखी, उलट्या किंवा जुलाब, चक्कर येणे अशी लक्षणे दिसली तर ती अन्नाची ॲलर्जी असू शकते. ते ओळखण्यासाठी तुम्ही काही चाचण्या करू शकता. यासाठी स्किन प्रिक टेस्ट केली जाते. यामध्ये तुम्हाल नेमक्या कोणत्या पदार्थाच्या सेवनाने ॲलर्जीची समस्या होत आहे हे समजण्यासाठी अन्नपदार्थाची थोडीशी मात्रा शरीराच्या कोणत्याही भागावर लावली जाते आणि त्वचेला हलकेच टोचले जाते. जर तिथे सूज किंवा लालसरपणा असेल तर ते ॲलर्जीचे लक्षण असू शकते. याशिवाय, रक्त तपासणी केली जाते. यामध्ये, इम्युनोग्लोबुलिन ई (आयजीई) अँटीबॉडीचे प्रमाण मोजले जाते, जे ॲलर्जीची प्रतिक्रिया दर्शवते.
ॲलर्जी झाल्यावर कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?
अमेरिकन कॉलेज ऑफ ॲलर्जी, अस्थमा आणि इम्युनोलॉजी (ACAAI) नुसार , फुड ॲलर्जीवर उपचार घेण्यासाठी तुम्ही ऍलर्जिस्ट आणि आहारतज्ञ दोघांचाही सल्ला घ्यावा. हे डॉक्टर ॲलर्जी ओळखतील आणि समस्येनुसार तुमच्यासाठी आहार चार्ट देखील तयार करतील.
