
कोविडने जगभरात हाहाकार माजवला असताना आपण सगळेजण हळूहळू कोरोनाच्या महामारीतून बाहेर पडलो. त्यानंतर आता काही दिवसांपासून चीनमध्ये ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) या नव्या विषाणूने थैमान घातले आहे. हा विषाणू लहान मुलांना संक्रमित करत असून भारतातही दोन प्रकरणे समोर आली आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) याला दुजोरा दिला आहे. खोकला, शिंकण्याद्वारेही हा विषाणू पसरत असल्याने सरकारही याबाबत सतर्क आहे. लहान मुलांमध्ये या विषाणूचा फैलाव होत असल्याने चिंता आणखीनच वाढली आहे. ज्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यांना या विषाणूची लागण होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
एचएमपीव्ही विषाणूची लक्षणेही कोविडसदृश दिसून येत आहेत. एखाद्या मुलाला किंवा नवजात बाळाला या विषाणूची लागण झाली तर पहिले लक्षण म्हणजे खोकला. खोकल्यामध्ये कफ तसेच ताप असू शकतो. या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते. कारण हा विषाणू श्वसनमार्गातील फुफ्फुसांवर परिणाम करतो आणि यामुळे छातीत दुखण्याबरोबरच श्वासोच्छवासाचा त्रास होतो. लक्षणे दिसल्यास मुलांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्या.
अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, दिल्लीचे इंटरनल मेडिसिन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. अनिल गोंबर म्हणतात की, भारतातही हा व्हायरस पसरलेला नाही, पण आगामी काळात त्याचा धोका लक्षात घेता सावध राहण्याची गरज आहे. लहान मुलांव्यतिरिक्त वृद्धांमध्येही हा विषाणू संसर्ग पसरवू शकतो, कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
खोकला आणि शिंकताना हा विषाणू इतरांना संक्रमित करू शकतो, त्यामुळे एखाद्याला मुलाला अशी लक्षणे दिसल्यास कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तीला आणि लहान मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवा. तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. मुलांना दूध पाजण्यापूर्वी स्वत:ला आणि हातांना नीट स्वच्छ करा. कोणतेही काम करण्यापूर्वी हात धुण्यास विसरू नका. मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाणे टाळा. ताप आणि खोकल्यासह छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा
रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी भरपूर झोप घेणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
रात्री किमान ७ ते ८ तास पुरेशी झोप घ्या.
मूल थोडं मोठं असेल तर त्याला हलकी शारीरिक व्यायाम करायला लावा.
तसेच मोठ्यांनीही नियमित थोडेफार रोज व्यायाम आणि योगा करावा.
तुमच्या आहारात प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करा.
हिवाळ्याचा हंगाम असल्याने या दिवसात येणारी फळे तसेच पेरू, संत्री, आवळा, खजूर अशी फळे खा.
बाजरी, मका, ज्वारी, नाचणी यांचा आहारात समावेश करा.
हिरव्या पालेभाज्या, मोहरीच्या भाज्या, पालक, मेथी या भाज्यांचे सेवन करा.
थोडी फार लक्षणे दिसल्यास लगेच गरम पाण्याची वाफ घेऊन संक्रमण धोका दूर करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)