भारतात तब्बल इतक्या लोकसंख्येला मधुमेहाची बाधा, लॅंसेटच्या नव्या पाहणीत धक्कादायक आकडेवारी
देशातील 28 राज्ये, राजधानी दिल्लीसह दोन केंद्रशासित प्रदेशात 20 वर्षावरील वयोगटातील 1,13,043 नागरिकाचा सॅम्पल साईजचा वापर या पाहणीसाठी करण्यात आला. लॅंसेट या संस्थेमार्फत ही पाहणी करण्यात आली आहे.

दिल्ली : देशातील नागरिकांना मधुमेहाचा ( Diabetes ) विळखा पडला आहे. या आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. बदलेली जीवनशैली, बदलले रहाणीमान, व्यायामाचा अभाव, प्रदुषण आणि ताणतणावामुळे मधुमेहाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. देशातील प्रगत राज्यात डायबेटीसचे प्रमाण जास्त असून तुलनेने मागासलेल्या राज्यात डायबेटीसचे प्रमाण त्या तुलनेत कमी असल्याचा अभ्यासात आढळले आहे. इंडीयन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च ( ICMR ) आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मदतीने लॅंसेट ( Lancet ) या संस्थेने ही अभ्यास पूर्ण पाहणी केली आहे.
लॅंसेट या संस्थेने साल 2008 ते 2020 वर्षे केलेल्या या सर्वेक्षणातून म्हटले आहे की 101 दशलक्ष ( सुमारे 10 कोटी ) भारताचे नागरीक म्हणजे देशाच्या लोकसंख्येच्या 11.4 टक्के नागरिक डायबेटिस या आजारासह जगत आहे. देशातील 136 दशलक्ष ( सुमारे 13 कोटी ) नागरिकांना ( प्री-डायबेटिस ) डायबेटिस पूर्व लक्षणे आहेत. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 15.3 टक्के लोकांना प्री-डायबेटिस आहे. या नागरिकांना टाईप टू डायबेटिसचा धोका आहे. या नागरिकांना हाय ब्लड शुगरचा त्रास आहे, कारण त्यांच्या शरीरात पुरेशा इन्सुलिनची निर्मिती होत नाही. भारतात अपेक्षापेक्षा वेगाने डायबेटिसचा प्रसार होत असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.
गोव्यात जास्त उत्तर प्रदेशात कमी मधुमेही
डायबेटिसचे सर्वाधिक प्रमाण गोवा ( 26.4% ), पुदुचेरी ( 26.3% ) आणि केरळ (25.5%) या राज्यात आहे. या अभ्यासात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण कमी आहे, गोवा सारख्या कमी संख्येच्या राज्यात डायबेटिसचा प्रभाव जास्त तर सर्वाधिक लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशात ( 4.8% ) कमी आहे.
प्री-डाबेटिसचा सर्वात जास्त प्रसार
डायबेटीसचा गोव्यात ( 26.4 टक्के ) सर्वात जास्त प्रमाण तर सर्वात कमी प्रमाण उत्तर प्रदेशात ( 4.8 टक्के ) आढळळे आहे. तर प्री-डाबेटिसचा सर्वात जास्त प्रमाण सिक्कीममध्ये ( 31.3 टक्के ) तर सर्वात कमी मिझोरममध्ये ( 6.8 टक्के ) आढळला. पंजाबमध्ये (51.8 टक्के ) हायपर टेन्शनचा सर्वात जास्त प्रमाण तर सर्वात कमी मेघालयात ( 24.3 टक्के ) आढळले.
ही टाईम बॉम्बची टिक, टिक
जागतिक आरोग्य संघटनेने याआधी भारतात 77 दशलक्ष लोकांना डायबेटिस आणि 25 दशलक्ष लोकांना प्री – डायबेटिस होईल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतू त्यापेक्षा डायबेटिसचे प्रमाण वाढले आहे. ही एका टाईम बॉम्बची टिक, टिक असल्याचे या अभ्यासाच्या लीड ऑथर आणि डॉ.मोहन डायबेटिस स्पेशिलीटीस सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. आर.एम. अंजना यांनी म्हटले आहे. तुम्ही प्री – डायबेटिस असाल तर त्याचे डायबेटिसमध्ये रुपांतर होण्याचा वेग फार मोठा आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत साठ टक्क्यांहून अधिक प्री – डायबेटिसचे रुपांतर डायबेटिसमध्ये होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
