Health | सांध्यांना सूज येते, वजनही कमी होते, जाणून घ्या काय आहे ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस आणि त्याचे महिलांवर होणारे परिणाम

ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस (Rheumatoid Arthritis) हा ऑटोइम्युन आजार आहे आणि याचा पुरुषांच्या तुलनेने महिलांवर अधिक परिणाम होतो. महिलांमध्ये असलेल्या फिमेल हार्मोन्समुळे (संप्रेरके) महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असते.

Health | सांध्यांना सूज येते, वजनही कमी होते, जाणून घ्या काय आहे ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस आणि त्याचे महिलांवर होणारे परिणाम
ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस

मुंबई : ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस (Rheumatoid Arthritis) हा ऑटोइम्युन आजार आहे आणि याचा पुरुषांच्या तुलनेने महिलांवर अधिक परिणाम होतो. महिलांमध्ये असलेल्या फिमेल हार्मोन्समुळे (संप्रेरके) महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असते. तुमच्या आसपास ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस असलेल्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचे निरीक्षण योग्य आहे. चला तर मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या ऱ्हुमेटॉलॉजिस्ट डॉ. दिप्ती पटेल (Dr. Dipti Patel) यांच्याकडून जाणून घेऊया या आजारासंबंधित अधिक माहिती…(Know the details about Rheumatoid Arthritis disease by Dr. Dipti Patel)

Dr. Dipti Patel

डॉ. दिप्ती पटेल, ऱ्हुमेटॉलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल

 ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे काय?

ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस हा सांध्याचा आजार असतो. यात सांध्यांना सूज येते, त्यामुळे वेदना होतात आणि सांध्यांमध्ये ताठरपणा येतो. ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस हा सूज येणारा आणि ऑटोइम्युन आजार आहे. म्हणजे तुमच्या शरीरातील प्रतिकारक यंत्रणा आपल्या स्वतःच्या सुदृढ पेशींवर हल्ला करते आणि त्यामुळे याचा परिणाम झालेल्या भागांमध्ये सूज येते.

 ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस होण्याचे प्रमाण महिलांमध्ये जास्त का असते?

संशोधनानुसार, ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस पुरुषांच्या तुलनेने महिलांवर अधिक परिणाम करतो. महिलांमध्ये गंभीर स्वरुपाची आणि वारंवार लक्षणे दिसून येतात. ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिसची वाढ होण्यात वय आणि लिंग यांची महत्त्वाची भूमिका असते. पुरुषांच्या तुलनेने महिलांमध्ये ऑटोइम्युन आजार होण्याची शक्यता अधिक असते. महिलांची प्रतिकारक यंत्रणा अधिक प्रतिक्रिया करणारी आणि बळकट असल्याने असे होत असल्याची शक्यता आहे. महिलांमधील संप्रेरके हे यामागील मुख्य कारण आहे. महिलांमधील संप्रेरकांमुळे ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिसची जोखीम वाढते आणि हा आजार बळावतो.

 ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस होण्यात संप्रेरकांची काय भूमिका असते?

संप्रेरके आणि ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस यांच्यात नक्की काय संबंध आहे ते अजूनही अज्ञात असले तरी महिलांमधील संप्रेरकांच्या पातळीमध्ये बदल झाला की महिलांना ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस होतो, असे दिसून आले आहे. प्रसूतीनंतर किंवा रजोनिवृत्तीच्या आधी महिलांमध्ये होणाऱ्या संप्रेरकांच्या असंतलुनामुळे महिलांवर ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिसचा अधिक परिणाम होतो. ज्या महिलांना ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस होण्याची शक्यता असते तो त्यांना बहुधा त्यांच्या प्रजननक्षम वयात होतो. गरोदरपणादरम्यान त्यांना ही लक्षणे वाढताना दिसून येऊ शकतात. बाळाच्या जन्मानंतर त्यात वाढ झाली असण्याची शक्यता असते. त्यामुळे, ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस आणि संप्रेरकांचा संबंध आहे हे सूचित होते. 2 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ स्तनपान दिल्याने ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस होण्याची जोखीम कमी होते, असे दिसून आले आहे.

ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिसची लक्षणे

ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस होण्यासाठी लिंग हा महत्त्वाचा घट असला तरी वय हासुद्धा अजून एक तितकाच प्रभावी घटक आहे. पुरुषांच्या तुलनेने महिलांना ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस होण्याची शक्यता अधिक असते आणि वयाच्या तिसऱ्या ते पाचव्या दशकामध्ये याची लक्षणे दिसून येतात (Know the details about Rheumatoid Arthritis disease by Dr. Dipti Patel).

ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिसचे संकेत आणि लक्षणे खालीलप्रमाणे :

1) एकाहून अधिक सांध्यांमध्ये वेदना होणे

2) सांध्यांमध्ये ताठरता येणे

3) सांध्यांना सूज जेणे

4) वजन कमी होणे

5) ताप

6) थकवा

7) अशक्तपणा

लक्षणांचे प्रतिबिंब – शरीराच्या दोन्ही बाजूंमध्ये म्हणजे दोन्ही हातांमध्ये किंवा पायांमध्ये किंवा गुडघ्यांमध्ये वेदना होणे

ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिसचे निदान

लक्षणे आणि संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिसचे प्राथमिक निदान केले जाते. वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्या आणि एक्स-रे यामुळे निदान निश्चित होते. तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब तुमच्या फिजिशिअनशी संपर्क साधा. लक्षणे सुरू झाल्याच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिसचे निदान झाले, तर हा आजार कमी करता येतो किंवा त्याच्या वाढीला खीळ घालता येते आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंतही कमी करता येते. सूज येण्याच्या प्रक्रियेला दडपण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी परिणामकारक आणि वेळेत उपचार सुरू केल्यामुळे ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिसच्या घातक परिणामांना कमी करण्यास मदत होते.

ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिससह जगणे

ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिसचा तुमचे काम, विरंगुळा आणि इतर सामाजिक क्रियांवर म्हणजेच एकूणच दिनचर्येवर परिणाम होतो. या आजार असतानाही चांगल्या दर्जाचे आयुष्य जगणे साध्य करणे हे उद्दिष्ट आहे. ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस असूनही जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठीच्या काही कृती येथे देत आहोत (Know the details about Rheumatoid Arthritis disease by Dr. Dipti Patel).

व्यायाम

ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस हाताळण्यासाठी स्वतःला अॅक्टिव्ह ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. नियमित व्यायामामुळे हृदयविकार, नैराश्य, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्थूलपणासारख्या इतर गंभीर आजारांचा धोका कमी होतो. तुम्ही रोज चालणे किंवा जॉगिंग करू शकता किंवा आठवड्यातील पाच दिवस दररोज 30 मिनिटे स्विमिंग किंवा सायकलिंग करू शकता. दर आठवड्याला 150 मिनिटांचा मध्यम स्वरुपाचा व्यायाम करणे ही ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये लवचिकता राखण्याची गुरुकिल्ली आहे. तुम्ही ही 30 मिनिटे दिवसातून 3 वेळा 10 मिनिटांच्या सेटमध्येही विभागू शकता.

मानसिक आराम

सर्व ऑटोइम्युन आजार तुमच्या मानसिक अवस्थेशी निगडीत असतात. तुम्ही जेवढे अधिक तणावाखाली आणि चिंतेत असाल तेवढी ऑटोइम्युन आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. काही रिलॅक्सेशन (आराम मिळविण्याच्या) तंत्रांचा वापर करून तुमचे मन शांत व संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा. रिलॅक्स राहण्यास शिका आणि प्रत्येक दिवस समाधानाने जगा. छोट्या छोट्या बाबींचा त्रास करून घेऊ नका. कारण त्यामुळे तुमच्या लक्षणांची तीव्रता वाढण्याची शक्यता असते.

वजन प्रमाणात राखणे

ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिसची हाताळणी करण्यासाठी वजन प्रमाणात राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. आरोग्याच्या बहुतेक समस्यांसाठी स्थूलपणा हे प्रमुख कारण असते. वजन प्रमाणात ठेवण्यासाठी सकस आणि पोषक आहार घ्या आणि दररोज व्यायाम करा.

ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिसचे प्रमाण महिलांमध्ये अधिक असले तरी त्यामुळे तुमच्या उत्साहात घट होता कामा नये. लवकर निदान झाले आणि योग्य उपचार केले तर तुम्ही वेदनारहीत निरोगी आयुष्य जगू शकता.

 (टीप : उपरोक्त लेख हा मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील ऱ्हुमेटॉलॉजिस्ट डॉ. दिप्ती पटेल यांच्या माहितीवर आधारित आहे. कोणत्याही उपचारांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(Know the details about Rheumatoid Arthritis disease by Dr. Dipti Patel)

हेही वाचा :

कोरोना झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज किती दिवस राहतात? चकीत करणारी माहिती समोर

देशी तूपाचे आरोग्यदायी फायदे, डोळे, हाडे आणि हृदयासाठी खूप गुणकारी, जाणून घ्या 5 चमत्कारी फायदे