Know This: दोन्ही लसी टोचल्या खऱ्या, पण आता कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटला त्या आवर घालणार का?

| Updated on: Nov 29, 2021 | 6:18 PM

हा ओमिक्रॉम व्हेरिएंट आहे तरी काय? याची उत्पत्ती कशी आणि कुठे झाली आणि हा जगासाठी किती धोकादायक ठरु शकतो, हेच आपण आज समजून घेणार आहोत.

Know This: दोन्ही लसी टोचल्या खऱ्या, पण आता कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटला त्या आवर घालणार का?
कर्नाटकमधून ओमिक्रॉनचा पहिला पेशंट पळाल्याची माहिती, प्रशासनाचा दुजोरा
Follow us on

आशिष सूर्यवंशी: कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे, आणि आता कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट याला कारणीभूत ठरतो आहे, या कोरोना व्हेरिएंटचं नाव आहे ओमिक्रॉन. या व्हेरिएंटची दहशत इतकी आहे की, अनेक देशांनी आपल्या सीमा विदेशी नागरिकांसाठी बंद केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा हा व्हेरिएंट सापडला, त्यानंतर विविध देशांत याचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे, आधीच्या डेल्टा व्हेरिएंटहून कित्येक पटीने अधिक याचं संक्रमण होत असल्याचं तज्ञ सांगताहेत. त्यामुळेच प्रश्न तयार होतो, हा ओमिक्रॉम व्हेरिएंट आहे तरी काय? याची उत्पत्ती कशी आणि कुठे झाली आणि हा जगासाठी किती धोकादायक ठरु शकतो, हेच आपण आज समजून घेणार आहोत. (Learn all about the new Omicron variant of the Corona found in South Africa)

कुठं सापडला ओमिक्रॉम, आणि कसा ओळखला?

कोरोना विषाणूचा हा प्रकार सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे, जागतिक आरोग्य संघटनेनेच याचं नामकरण ओमिक्रोन केलं, ज्याला B.1.1.529 नावानेपण ओळखलं जातं. 24 नोव्हेंबरला WHO ने याबाबत खुलासा केला. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, या विषाणूत खूपसारे म्युटेशन झाले आहेत, म्हणजे या आधीच्या कोरोना विषाणूहून पूर्णपणे बदलेला आहे. त्यामुळे याचा संक्रमण दर इतर व्हेरिएंटहून खूप जास्त असल्याचं तज्ञ सांगत आहेत. दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टर एंजेलिक कोएत्जी यांनी सर्वात आधी या व्हेरिएंट शोधला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत ज्या लोकांना याची लागण झाली आहे, त्यांच्यात खूपच सामान्य लक्षणं दिसत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे, यातील बहुतांश लोकांना अंगदुखी आणि थकवा जाणवतो आहे, आणि हे सर्व तरुण वयाच्या लोकांमध्येच दिसतं आहे, जी सर्वात चिंतेची बाब आहे.

कुठल्या कुठल्या देशात पसरला ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंट!

आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेशिवाय, जगभरातल्या इतरही देशात या व्हेरिएंटचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये ब्रिटनसह ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इस्रायल, हाँगकाँग, बेल्जियम यांचा समावेश आहे. नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर जगात बहुतांश देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. दक्षिण आफ्रिकेत जाणारी अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. शिवाय, जे प्रवासी आधी दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत, त्यांना विलगीकरण कक्षात ठेऊन त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत.

भारताची काय परिस्थिती?

भारतात अजून तरी या व्हेरिएंटचे रुग्ण सापडले नाहीत, मात्र, लोक दक्षिण आफ्रिकेवरुन भारतात आले आहेत, त्यांना क्वारंटाईन करुन त्यांची कोरोना टेस्ट केली जात आहे. काल दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनवरुन डोंबिवलीत आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं, पण याला नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने ग्रासलं आहे का? हे अद्याप स्पष्ट नाही. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याच्या कुटुंबाची तपासणी आज करण्यात आली आहे. त्याच्या कुटुंबातील सहा जणांची कोरोना टेस्ट झालीये. त्यापैकी पाच जणांचा अगहवाल ही निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळालाय. तर, एका नातेवाईकाच्या अहवालाची अजूनही प्रतीक्षा आहे. केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी याबाबतची माहिती दिलीये.

‘ओमिक्रॉन’ची जगाला एवढी भिती कशासाठी?

ही गोष्ट यावरुन समजून घ्या, की ज्या डेल्टा व्हेरिएंटने जगाला वेठीस धरलं, त्याच्या तुलनेत हा नवा व्हेरिएंट कित्येक पटीने मजबूत आहे, त्यात अनेक बदल झाले आहेत, आणि त्याची संक्रमण होण्याची शक्तीही वाढल्याचं तज्ञ सांगत आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉन हा दुसऱ्या व्हेरिएंटपेक्षा खूप वेगळा आहे, ज्यात अतिशय वेगाने म्युटेशन होत आहे. आधीच्या व्हेरिएंटमध्ये ज्या गतीने म्युटेशन होत होते, त्याहून कित्येक पटीने गती या व्हेरिएंटची आहे.

आता हा किती धोकादायक आहे, हे यावरुन समजून घ्या, ज्या डेल्टा व्हेरिएंटने जगाला धडकी भरवली, त्यात 2 म्युटेशन झाले होते, तर आताच्या ओमिक्रॉनमध्ये तब्बल 50 म्युटेशन झाले आहेत, ज्यातील 30 हुन अधिक म्युटेशन हे फक्त स्पाईक प्रोटीनमध्ये आहे. स्पाईक प्रोटीन विषाणूचा तोच भाग असतो, जो शरीरात प्रवेश केल्यानंतर मानवी कोषिकांना चिटकण्याचं काम करतो. विशेष म्हणजे, या स्पाईक प्रोटीनच्या मानवी कोषिकांना संपर्क करण्याच्या भागातही तब्बल 10 म्युटेशन झाले आहेत, म्हणजे आधीच्या कोरोना विषाणूहून हा शरीराला पूर्णपणे वेगळा वाटू शकतो.

‘ओमिक्रॉन’च्या बदलेल्या रुपाचा काय धोका?

इथं एक गोष्ट समजून घ्या, लस तयार करताना त्यात आधीच्या कोरोना विषाणूला ओळखणारे घटक टाकण्यात आले होते, त्यामुळे जेव्हा लस तुमच्या शरीरात जाते, तेव्हा ती या कोरोनाविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते. हीच प्रतिरक्षा प्रणाली कोरोनापासून तुमच्या शरीराचं रक्षण करण्याचं काम करत असते. हे अगदी असंच आहे, की पोलिसांना चोराचा फोटो दिला खरा, चोराला पकडण्यासाठी पोलिसही सज्ज आहेत, पण चोराने आपलं रुप बदलून पुन्हा चोरी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या हीच भिती जगभरातील तज्ज्ञांना सतावते आहेत, कारण, चीनच्या वुहानमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूपेक्षा ओमिक्रॉन पूर्णपणे वेगळा आहे. आणि इथंच पुढचा धोका मनात घरत करतो.

कोरोनाची लस ‘ओमिक्रॉन’वर प्रभावी ठरणार का?

तर लस घेतल्याशिवाय पर्याय नाही, कारण, हे एकच हत्यार आहे, जी कोरोनाचा सामना करु शकते. हा, जरी नव्या व्हेरिएंटवर लसीचा प्रभाव कमी वाटत असला, तरी ती तुम्हाला कोरोनात गंभीर संक्रमणापासून वाचवू शकते असं डॉक्टर सांगतात.

काही तज्ञांच्या मते, कोरोनाची लस ही आधीच्या कोरोना विषाणूला प्रतिबंध कऱण्यासाठी तयार करण्यात आली. ज्या लसीद्वारे तुमचं शरीर अँटीबॉडीज तयार करतं. दरम्यान, कोरोनाची लागण झालीच, तर शरीरात असलेल्या अँटीबॉडीज या कोरोना विषाणूला संपवतात. मात्र, आता हे गणितच उलट होताना दिसतं. तज्ज्ञांच्या मते, यातील N501 म्युटेशन कोरोना विषाणूला पसरवणं सोपं करतो, तर काही म्युटेशन अँटीबॉडिजला हा कोरोनाच आहे, हे समजणं अवघड बनवतो, त्यामुळेच लसीचा प्रभाव कमी होण्याचा धोका काही तज्ज्ञांना वाटत आहे. मात्र, असं असलं तरी लस ही तुम्हाला गंभीर संक्रमण होऊ देणार नाही, यावर बहुतांश तज्ज्ञ सहमत असल्याच दिसतात.

‘ओमिक्रॉन’ बद्दल आपण तिळाचा ब्रह्मराक्षस करतोय का?

असाही प्रश्न काही तज्ज्ञांना पडतो आहे, कारण जे आकडे कागदावर भयानक वाटतात, तेच वास्तवात खूप कमी रिझल्ट देताना दिसतात. गेल्या 2 महिन्यापासून आफ्रिकेत हा व्हेरिएंट सापडत आहे, पण त्यामुळे खूप काही नुकसान केलेलं नाही. अगदी अशीच भिती बीटा व्हेरिएंटबद्दलही वर्तवण्यात आली होती, जो 2021 च्या सुरुवातीला जगभरात सापडत होता. याची खास गोष्ट म्हणजे, प्रतिरक्षा प्रणालीला चकमा देऊन शरीरात शिरण्याची क्षमता होती. पण, नंतर हा व्हेरिएंट जगभरात पसरला नाही. उलट आधी ज्या व्हेरिएंटला कमी धोकादायक मानलं गेलं, त्या डेल्टा व्हेरिएंटने जगभरात कहर केला. त्यामुळे ‘ओमिक्रॉन’ ही असाच असू शकतो असं अनेकांना वाटतं. मात्र, वाटतं म्हणून गाफिल राहून चालणार नाही, कारण, या व्हेरिएंटबद्दल अजून खूप काही माहिती मिळणं बाकी आहे, त्यातच याची संक्रमता पाहता, सावध राहणं जास्त गरजेचं आहे.

हेही वाचा:

मुंबईकरांनो सावधान, आफ्रिकेतून 19 दिवसात एक हजार लोक मुंबईत, ट्रेसिंग सुरू

विमानतळावर स्क्रिनिंग, जिनोम सिक्वेन्सिंग… ओमिक्रॉन रोखण्यासाठी ‘या’ गोष्टींवर भर देण्यास सुरू

Omicronचे भयः नाशिकमध्ये पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे