नाल्यात सापडलं 90 कोटींचं सोनं? सोन्याची नाणी आणि बिस्किटे… नशीबच उघडलं

बेल्झियममध्ये गटार खोदताना मजुरांना 90 कोटी रुपयांचा सोन्याचा खजिना सापडला. यात सोन्याची नाणी आणि बिस्किटे होती. अनेक दावेदार समोर आले, पण कोणीही मालकी हक्क सिद्ध करू शकले नाही. आता हे सोनं सरकारी खजिन्यात जमा झाले आहे. बेल्झियमच्या कायद्यानुसार, 5 वर्षांनंतरही खरा मालक न मिळाल्यास, शोधकर्त्याला ते मिळण्याची शक्यता आहे.

नाल्यात सापडलं 90 कोटींचं सोनं? सोन्याची नाणी आणि बिस्किटे... नशीबच उघडलं
Belgium treasure
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2026 | 5:51 PM

काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती. एका मजुराला नाल्याचं खोदकाम करताना सोनं सापडलं होतं. हे सोनं थोडं थोडकं नव्हतं तर कोट्यवधी रुपयांचं होतं. जेव्हा या सोन्याची किंमत काढली गेली तेव्हा ते 90 कोटीचं सोनं निघालं. विशेष म्हणजे ही सर्व सोन्याची बिस्किटे आणि नाणी होती. गेल्या अनेक महिन्यांपासून या सोन्याच्या मालकाचा शोध घेण्यात आला. पण तो सापडला नाही. अनेकांनी पुढे येऊन सोन्यावर दावा केला. पण हे सोनं आपलंच आहे हे कुणीही पुराव्यानिशी सिद्ध करू शकला नाही. आता हे सोनं सरकारी खजिन्यात जमा करण्यात आलं आहे.

ऑगस्टमध्ये ही घटना घडली. बेल्झियमच्या सिंट गिलिस डेंडरमोंडे परिसरात एका जुन्या दारूच्या कारखान्यात गटाराचा पाईप टाकायचा होता. त्यासाठी मजुरांनी काही भाग खोदला. खोदल्यावर एका विद्यार्थ्याला आणि त्याच्यासोबतच्या काही लोकांना जुनी सोन्याची नाणी तिथे आढळली. नंतर सोन्याची बिस्किटेही दिसली. सुरुवातीला वाटलं ही नाणी आणि बिस्किटे सोन्याची नसावीत. आधी एक दोन नाणी आणि बिस्किटे दिसली. पण जस जसं खोदत गेल्यावर तिथे सोन्याचं भांडारच असल्याचं दिसून आलं. बघता बघता 90 कोटीचं सोन त्या ठिकाणी सापडलं.

Loading...

बॅग आणि विटा

मातीचा ढिगारा हटवल्यावर तिथे सोन्याची बिस्किटे सापडली. ही सोन्याची बिस्किटे एकावर एक रचून ठेवली होती. जणू काही एकावर एक विटा रचाव्यात तशी ही बिस्किटे एकावर एक ठेवली होती. हा खजिना एका बॅगेत भरून भुयारात लपून ठेवला होता. पण खोदकामानंतर सर्व काही बाहेर आलं. ज्या इमारतीत हा खजिना सापडला, ती इमारत 19 व्या शतकाच्या अखेरीस श्रीमंत मद्य व्यापारी कुटुंबातील एक व्यक्ती थियोफिलस वान एस्शे याने बनवली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं सापडल्यावर काही लोकांनी त्यावर दावा करण्याचा प्रयत्न केला. अनेक लोक आले. पण त्यांना हे आपलंच सोनं आहे हे सिद्ध करता आलं नाही.

मागच्या जन्मात लपवलं

एका आशियाई व्यक्तीने मेल करून या सोन्यावर दावा केला. गेल्या जन्मात मी 1960 च्या दशकात बेल्झियममध्ये राहत होतो. त्यावेळी मी हे सोनं लपवलं होतं. मला ही गोष्ट स्वप्ना सारखी आठवते, असं त्याने म्हटलं. तर एक लिथआनियाच्या व्यक्तीने तर, माझे आजोबा बेल्झियममध्ये वान एस्शे कुटुंबात काम करत होते. त्यांनीच हे सोनं तिथं लपवलं होतं. ते आयुष्यभर हेच सांगत होते, असा दावा या व्यक्तीने केला.

2031 पर्यंत वाट पाहावी लागणार

बेल्झियमच्या कायद्यानुसार, जर कुणाच्या वस्तू मिळाल्या तर आधी त्याचा मालक शोधला जातो. या वस्तू किंवा सामानाचा मालक मिळाल नाही तर शोधाबाबतची माहिती सात दिवसात नगरपालिकेला द्यायची असते. जर खरा मालक समोर आला नाही आणि कायदेशीर प्रक्रियेचं पालन झालं तर पाच वर्षानंतर त्या वस्तू किंवा सामान शोधणाऱ्याला त्याचा मालकी हक्क दिला जातो. त्यामुळे 2031 पर्यंत खऱ्या मालकाची वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतरही कोणीच येऊन दावा केला नाही तर हे सोनं कुणाला मिळेल हे पाहावं लागणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us